Ben Stokes Bouncer Hit Shubman Gill hand and Finger Video: शुबमन गिल इंग्लंडविरूद्ध मालिकेत खोऱ्याने धावा करत आहे. गिलने आतापर्यंत इंग्लंडविरूद्ध मालिकेत ७२२ धावा केल्या असून अनेक मोठमोठ्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. मँचेस्टर कसोटीत तर गिलने वेदनेत असतानाही कमालीची फलंदाजी करत शतक झळकावलं आहे आणि संघाचा डाव सावरला. या शतकी खेळीदरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या बाऊन्सरवर गिलच्या हाताला दुखापत झाली आणि तो चांगलाच कळवळला.
शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध चौथ्या कसोटीत २३८ चेंडूत १२ चौकारांसह १०३ धावांची खेळी करत बाद झाला. त्यापूर्वी त्याने केएल राहुलबरोबर १८० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. राहुल ९० धावा करून बाद झाला, पण गिलने मात्र शतक पूर्ण केलं. या शतकासह गिलने डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या मांदियाळीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.
स्टोक्सच्या चेंडू गिलच्या डोक्यावर
पाचव्या दिवसाच्या खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. स्टोक्सला चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत असल्याने त्याने गोलंदाजी केली नव्हती. पण पाचव्या दिवशी मात्र तो गोलंदाजी करताना दिसली. स्टोक्सने या मालिकेत कमालीची गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स आपल्या नावे केले आहेत.
बेन स्टोक्सच्या बाऊन्सरने शुबमन गिलला अक्षरश: रडवलं. चौथ्या दिवशी सुरूवातीलाही गिलला बोटाला दुखापत झाली होती. दरम्यान पाचव्या दिवशी गोलदाजांना एक्स्ट्रा बाऊन्स मिळत आहे, ज्याचा त्यांना फायदा होत आहे. स्टोक्सचा एक चेंडू अचानक एका गुड लेंग्थवरून खूप वेगाने उसळला आणि गिलला त्याचा फटका बसला. चेंडू प्रथम त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागला आणि नंतर हेल्मेटच्या बाजूला जोरात लागला.
वेदना होत असतानाही गिलने झळकावलं शतक
चेंडू गिलला लागताच तो ओरडला आणि भारतीय कर्णधाराने लगेचच त्याची बॅट जमिनीवर टाकली. ग्लोव्हज काढत त्याने जोरजोरात हात झटकायला सुरूवात केली आणि वेदनेने कळवळत खेळपट्टीपासून दूर गेला. गिलची अवस्था पाहून टीम इंडियाचे फिजिओ देखील मैदानावर धावले आणि भारतीय कर्णधाराचा हात तपासला. त्यांनी गिलच्या हातावर जादूचा स्प्रे लावला, ज्यामुळे वेदना कमी होतात. पण त्यानंतरही, गिल वेदनेमुळे अस्वस्थ दिसत होता आणि या वेदना असतानाही खेळत राहिला.
दुखापत होऊनही गिल थांबला नाही आणि त्याने मालिकेतील त्याचे चौथे शतक झळकावले. गिलने २२८ चेंडूत त्याचे ९वे कसोटी शतक पूर्ण केले.