Shubman Gill Trying to Copy Virat Kohli: रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर दिली आहे. गिलच्या नेतृत्त्वाखाली भारताने बर्मिंगहम कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवला. पण लॉर्ड्स कसोटीत शुबमन गिलची मैदानावरील वागणूक पाहता त्याला माजी खेळाडूने फटकारलं आहे.

शुबमन गिलला मैदानावरील त्याच्या आक्रमकतेबद्दल सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. लॉर्ड्स कसोटीत जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्यावर अचानक संतापला होता. कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस खेळ लवकर संपावा आणि फार षटकं होऊ नये यासाठी तो मुद्दाम वेळ घालवत होता. नेहमी शांत दिसणारा गिल हे पाहून चांगलाच संतापला आणि त्याच्याबरोबर वाद घालताना दिसला.

माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारी देखील त्याच्यावर टीका केली आहे. मनोज तिवारी म्हणाला की, “शुबमन गिल विराट कोहलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. तो फलंदाजी करत असताना याचा त्याला फायदा होणार नाहीये. मनोज तिवारीच्या मते, ‘कर्णधार गिल ज्या पद्धतीने खेळत आहे ते मला आवडत नाहीये. मला वाटतं की तो विराटची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. पण याचा फलंदाजी करताना त्याला काहीच फायदा होताना दिसत नाहीये.”

तिवारी म्हणाला, “आयपीएलमध्ये कर्णधार झाल्यापासून मी पाहिलं आहे की तो आक्रमक मानसिकने मैदानावर वावरत आहे आणि पंचांशी खूप वाद घालत आहे. हा गिल पूर्वीसारखा नाहीये. त्याला अशा प्रकारे आक्रमकता दाखवण्याची किंवा त्याला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.”

“मला माहित आहे की कर्णधाराने पुढे राहून कायम संघाचं नेतृत्व करावं, पण इतका आक्रमक पवित्रा घेण्याची गरज नाही. त्यामुळे त्याची ऊर्जा वाया जाते. त्याच्यामध्ये आक्रमक शैली असावी पण याचा अर्थ त्याने नेहमीच प्रतिक्रिया दिली पाहिजे असा होत नाही. कसोटी सामना जिंकूनही आक्रमकता दाखवता येऊ शकते”, असे मनोज तिवारी पुढे म्हणाला.

मनोज तिवारी म्हणाला, “भारत मालिकेत सहज २-१ ने पुढे राहू शकला असता. अशा प्रकारची आक्रमकता खेळासाठी चांगली नाही. विशेषतः भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून तर नाहीच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलची मैदानावरील भाषा ऐकून मनोज तिवारी म्हणाला, “तो स्टम्पजवळ असताना माईकमध्ये रेकॉर्ड झालेलं बोलणं मी ऐकलं. त्यामध्ये वापरले गेलेले शब्द मला पटले नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत आहात. मला वाटतं की हा एक ट्रेंड झालाय; कारण, आधीच्या कर्णधारांनी राग व्यक्त करण्यासाठी असे शब्द वापरले असतील, परंतु यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्ही अपशब्द वापरले तर पुढची पिढी तेच शिकेल.”