scorecardresearch

Premium

BAN vs SL: अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट दिल्याने श्रीलंकेचे चाहते नाराज, क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे किती आहेत प्रकार? जाणून घ्या

BAN vs SL World Cup 2023: अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआउट होणारा पहिला फलंदाज ठरला. त्यामुळे फलंदाज कोणत्या प्रकारे बाद होऊ शकतो? जाणून घेऊ या.

BAN vs SL: Sri Lankan fans upset after Angelo Mathews was given time out How many types of dismissals are there in cricket find out
क्रिकेटमध्ये फलंदाज एकूण अकरा पद्धतीने बाद होऊ शकतो. सौजन्य- (ट्वीटर)

Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: विश्वचषकाच्या ३८व्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआऊट होणारा तो पहिला फलंदाज ठरला. या संपूर्ण प्रकरणामध्ये सोशल मीडियावर काही लोक मॅथ्यूजवर आरोप करत आहेत, तर काही लोकांनी बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनच्या खेळाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

वास्तविक, २५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेव्हा सदीरा समरविक्रमा बाद झाला तेव्हा अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. मॅथ्यूज जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा त्याने चुकीचे हेल्मेट आणले होते. त्याने राखीव खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. त्यामुळे पंच आणि बांगलादेशी खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तो हेल्मेट घेऊन वेळेवर येऊ शकला नाही त्यामुळे शाकिबने श्रीलंकन संघ वेळकाढूपण करत असल्याची तक्रार केली. यानंतर पंचांनी मॅथ्यूजला आऊट दिले.

Sajeevan Sajna hit a winning six off the last ball against Delhi Capitals
WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष
AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
it was my dream to play for india in front of my father says sarfaraz khan
वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया
Rahul Dravid believes that Ishan needs to start playing for selection
निवडीसाठी इशानला खेळण्यास सुरुवात करण्याची गरज- द्रविड

शाकिबने अपील मागे घेतले नाही

मॅथ्यूजने शाकिब-अल-हसनशी संवाद साधला. शाकिबने अपील मागे घेतले नाही. त्यानंतर मॅथ्यूज रागाने पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने हेल्मेट आणि ग्लोव्हज डगआऊटमध्ये फेकले. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडही या संपूर्ण घटनेने चांगलेच संतापलेले दिसले. त्यामुळे नेमके क्रिकेटचे नियम काय आहेत आणि फलंदाज किती पद्धतीने बाद होऊ शकतो यावर एक नजर टाकूया.

आयसीसीचे काय नियम आहेत?

क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर नवीन येणारा फलंदाज टाईम आऊट होईल. एकूण ११ पद्धतीने फलंदाज आपली विकेट गमावू शकतो.

हेही वाचा: BAN vs SL: अँजेलो मॅथ्यूज टाईम ‘आऊट’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पडली अशाप्रकारे विकेट, बांगलादेश-श्रीलंका मॅचमध्ये नेमकं काय झालं?

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या एकूण अकरा पद्धती

१.बोल्ड (त्रिफळाचीत)

फलंदाज जेव्हा फटका मारण्यात अपयशी ठरतो किंवा हुकतो तेव्हा चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळतो त्याला त्रिफळाचीत असे म्हणतात. जेव्हा तीन स्टंप्स आणि दोन बेल्स यांच्यापैकी कशालाही चेंडू लागून ते आपल्या जागेवरून विलग होतात तेव्हा बोल्ड असं लिहिलं जातं.

२.कॉट (झेलबाद)

फलंदाजाने टोलवलेला चेंडू जेव्हा यष्टीरक्षक किंवा अन्य क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि तो झेलतो त्याला कॉट किंवा झेलबाद म्हटलं जातं. यष्टीरक्षक स्टंप्सच्या मागे झेल पकडू शकतो. यष्टीरक्षक आणि स्लिपमध्ये उभे असलेल्या क्षेत्ररक्षकांनी झेल पकडला त्याला कॉट बिहाइंड अर्थात स्टंप्सच्या मागे झेलबाद असं म्हटलं जातं.

३.लेग बिफोर विकेट (पायचीत)

कोणताही वैध चेंडू फलंदाजाच्या पायाला किंवा अन्य भागाला बॅटला स्पर्श होण्यापूर्वी लागला आणि तो चेंडू जर स्टंप्सला लागत असेल तर त्यावेळी एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत बाद दिलं जातं.

हेही वाचा: BAN vs SL: चारिथ असालंकाचे तुफानी शतक! श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी ठेवले २८० धावांचे आव्हान

४.रनआऊट (धावबाद)

फलंदाज जेव्हा फटका मारून धाव काढतात तेव्हा ती पूर्ण करताना विकेटकीपर एन्डला किंवा बॉलर एन्ड असलेल्या क्रीझमध्ये बॅट असणं अपेक्षित असतं. फलंदाज धाव पूर्ण करत असताना तो किंवा बॅट क्रीझमध्ये नसेल आणि त्याचवेळी यष्टीरक्षक किंवा गोलंदाज तसंच अन्य क्षेत्ररक्षकाने स्टंप्स-बेल्स उडवल्या तर रनआऊट दिलं जातं.

५.स्टंपिंग (यष्टीचीत)

मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज जेव्हा क्रीझबाहेर जातो, चेंडूचा अंदाज न आल्याने तो हुकतो आणि यष्टीरक्षक त्यावेळी चेंडू पकडून झटपट स्टंप्स आणि बेल्स उडवतो त्याला स्टंपिंग म्हटलं जातं. हा एकप्रकारे रनआऊटचाच प्रकार आहे.

६.रिटायर्ड (निवृत्त)

फलंदाज दुखापतीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे खेळताना पंचांच्या परवानगीविना तंबूत परतला. परतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या संमतीने जेव्हा तो पुन्हा खेळण्यासाठी येतो तेव्हा फलंदाजी सुरू करू शकतो. तो निर्धारित वेळेत खेळायला परत आलाच नाही तर त्याला आऊट दिलं जाऊ शकतं.

७.हिट द बॉल ट्वाईस

फलंदाजाने गोलंदाजाला चेंडू टाकल्यानंतर एकदाच खेळण्याची संधी मिळते. एकदा फटका खेळल्यानंतर फलंदाजाने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला तर नियमानुसार आऊट दिलं जाऊ शकतं. फलंदाजाने बॅटने किंवा शरीराच्या एखाद्या भागाने दुसऱ्यांदा खेळणं नियमानुसार चुकीचे आहे.

८.हिट विकेट (स्वत:च्या चुकीने बाद होणे)

फलंदाज जेव्हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग स्टंप्सवर, बेल्सवर आदळला तर हिट विकेट दिलं जातं. मोठा फटका मारताना किंवा स्वीप करताना फलंदाज संतुलन गमावतो आणि तो स्वत:च स्टंप्सवर आदळतो किंवा त्याची बॅट, हेल्मेट, अन्य वस्तूंपैकी एखादी गोष्ट स्टंप्सवर जाऊन आदळते त्यावेळी त्याला बाद दिले जाते.

९.ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड

फलंदाजाच्या कृतीने किंवा मुद्दामहून जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड’नुसार आऊट दिलं जातं.

१०.टाईम आऊट

एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतो. या बदलासाठी तीन मिनिटं मिळतात. पॅव्हेलियनमध्ये तयार असलेल्या फलंदाजाला क्रीझवर पोहोचण्यासाठी हा वेळ मिळतो. त्यावेळेत फलंदाज जर मैदानात खेळायला पोहोचला नाही तर त्याला टाईम आऊट दिलं जातं.

११.हँडल द बॉल

फलंदाजाने हाताने चेंडू रोखायचा प्रयत्न केला तसंच चेंडू आपल्यादिशेने येत असताना हाताने किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ‘हँडल द बॉल’ नियमामुसार आऊट दिलं जाऊ शकतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sl vs ban how many types of dismissals are there in cricket after angelo mathews was given time out avw

First published on: 06-11-2023 at 20:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×