scorecardresearch

Premium

SL vs BAN: १४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’चा बळी, पाहा संपूर्ण घटनेचा VIDEO

Cricket World Cup 2023, BAN vs SL Match Updates: अँजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटमध्ये समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे त्याला स्ट्राइक घेण्यास विलंब झाला. मॅथ्यूजला पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यासाठी दोन मिनिटे होती, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Angelo Mathews Timed Out in Bangladesh vs Srilanka Match in Marathi
अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट बांगलादेश वि श्रीलंका (फोटो- आयसीसी ट्विटर)

Angelo Mathews Timed Out against Bangladesh Match: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३८ वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करत आहे आणि याच दरम्यान असे काही घडले, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. वास्तविक, अँजेलो मॅथ्यूजला अशा प्रकारे आऊट करण्यात आले, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच घडले नव्हते. अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आला आणि श्रीलंकेची पाचवी विकेट गेली.

मॅथ्यूज खराब हेल्मेट घेऊन आला होता –

२५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर ही घटना घडली. यानंतर गोलंदाजी करणाऱ्या शाकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध ‘टाईम आऊट’ची अपील केली. वास्तविक, मॅथ्यूजने सुरुवातीला खराब हेल्मेट आणले होते, त्यानंतर त्याने हेल्मेट बदलण्यास सांगितले. यावर शाकिबने अपील केली. यावर फील्ड अंपायर माराईस इरास्मस यांनी शाकिबला वारंवार विचारले, तू खरोखरच अपील करत आहेस का? बांगलादेशचा कर्णधार म्हणाला, होय आम्ही अपील करत आहोत. यानंतर इरास्मसने मॅथ्यूजला आऊट दिले.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर आला तेव्हा त्याच्या हातात असलेले हेल्मेट बरोबर नव्हते. यानंतर बदली खेळाडू दुसऱ्या हेल्मेटसह आला. यावर पंच आनंदी दिसले नाहीत, त्यांनी श्रीलंकेच्या फलंदाजाशी चर्चा केली. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने टाइम आऊटची अपील केली. यानंतर अंपायरने शाकिबला विचारले की, खेळ भावनेनुसार अपील मागे घ्यायचे आहे का? यावर शाकिबने नकार दिला. अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि माराइस इरास्मस यांनी मॅथ्यूज आऊट दिले. त्यानंतर मॅथ्यूजने अंपायरला समजावून सांगितले पण त्यांनी ते मान्य केले नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले.

हेही वाचा – BAN vs SL: अँजेलो मॅथ्यूज टाईम ‘आऊट’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पडली अशाप्रकारे विकेट, बांगलादेश-श्रीलंका मॅचमध्ये नेमकं काय झालं?

टाइम आऊटचा नियम काय आहे?

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या प्लेइंग कंडिशनच्यानुसार विकेट पडल्यास किंवा फलंदाज रिटायर हर्ट आऊट झाल्यास, पुढील फलंदाजाने २ मिनिटांच्या आत चेंडू खेळण्यासाठी तयार असले पाहिजे. असे न झाल्यास फलंदाजाला टाइम आऊट जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूची वेळ संपली.

हेही वाचा – SL vs BAN: वयाच्या ३६ व्या वर्षी बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने दाखवली अप्रतिम चपळाई, एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल

बांगलादेशने अपील मागे घेतली असती तर मॅथ्यूज राहिला असता नाबाद –

आयसीसी कायदा ४०.१ टाइम आऊटशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याबाबत ३ मिनिटांचा नियम असला तरी २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत तो २ मिनिटांचाच ठेवण्यात आला आहे. शाकिबने अपील मागे घेतली असती, तर मॅथ्यूजला आऊट दिले नसते, पण बांगलादेशने तसे केले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अपील केली नसती किंवा ती मागे घेतली असते तर तो नाबाद राहिला असता. मात्र, समरविक्रमा आणि मॅथ्यूजला आऊट होण्यासाठी ५ मिनिटे लागली. समरविक्रमा भारतीय वेळेनुसार दुपारी ३.४९ वाजता आऊट झाला होता. त्यानंतर मॅथ्यूज ३.५४ वाजता टाइम आऊट झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sl vs ban match updates angelo mathews timed out against bangladesh in world cup 2023 vbm

First published on: 06-11-2023 at 17:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×