IND W vs SA W Smriti Mandhana Palash Muchhal celebration video: भारताच्या लेकींनी महिला विश्वचषक २०२५ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि देशभरात सगळीकडे याचा जल्लोष केला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दरम्यान स्मृती मानधनाने तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलसह मैदानावर या विजयाचा आनंद साजरा केला.
दरम्यान, संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने संपूर्ण स्पर्धेत तिच्या प्रभावी फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. स्मृतीचा प्रियकर आणि चित्रपट निर्माता-संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने आपल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आणि त्याचं तिच्याबद्दलचं प्रेम पाहून सर्वच जण त्याचं कौतुक करत आहे. ज्याचा व्हीडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
स्मृती मानधना भारताच्या विजयाच्या आनंद साजरा करत होती. यादरम्यानच पलाश मुच्छलला ती भेटण्यासाठी गेली. पलाशने तिला मिठी मारत तिचं कौतुक केलं. यानंतर पलाशने त्याच्या खांद्यावर असलेला भारताचा झेंडा स्मृतीच्या खांद्यावर ठेवला. नंतर तो झेंडा त्याने उघडून पसरून वर्ल्ड चॅम्पियन स्मृती मानधनाच्या खांद्यावर ठेवला. यानंतर तो मस्त वाटतोय असंही बोलताना व्हीडिओमध्ये दिसत आहे. स्मृती पलाशच्या या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पलाश मुच्छलने सोशल मीडियावरही या विजयानंतर दोन फोटो शेअर केले आहेत. त्याच्या पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंतिम सामन्यानंतर, भारताने विजय मिळवताच स्टेडियम टाळ्यांचा कडकडाटात दणाणून गेलं. भारतीय ध्वजात आणि विश्वचषक ट्रॉफी हातात घेतलेली स्मृती मानधना भावुक झालेली दिसत होती. यादरम्यानचा स्मृतीबरोबरचा फोटो पलाशने शेअर केला आहे.
तर पलाशने दुसरा फोटो हॉटेलमधील शेअर केला आहे. जिथे स्मृती उभी आहे आणि तिच्यासमोर तो ट्रॉफी हातात घेऊन उभा आहे. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे पलाशने त्याच्यावर हातावर काढलेला टॅटूही त्याने या फोटोमध्ये घेतला आहे. पलाशच्या हातावर SM18 हा टॅटू आहे. जो स्मृतीचा जर्सी नंबर आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं काही रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
