भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीचा सल्ला

विश्वविजेता संघनायक महेंद्रसिंग धोनीने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील धोनीच्या भवितव्याबाबत नुकतेच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर या माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. याबाबत गांगुली म्हणाला, ‘‘धोनीची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कामगिरी एकदिवसीय क्रिकेटइतकी समाधानकारक नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी स्वतंत्रपणे बोलायची आवश्यकता आहे. अचाट क्षमता असलेल्या धोनीने ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे वेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तो यशस्वी होऊ शकेल.’’

राजकोट येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत १९७ धावांचे लक्ष्य गाठताना भारताला झगडायला लागले होते. भारताची ४ बाद ९७ धावा अशी स्थिती असताना कोहलीच्या साथीला धोनी मैदानावर उतरला. परंतु परिस्थिती हाताळणे कठीण गेल्यामुळे भारताने हा सामना गमावला.

धोनी आणखी बरीच वष्रे एकदिवसीय क्रिकेट खेळू शकतो, असे गांगुलीने सांगितले. तो म्हणाला, ‘‘धोनीने एकदिवसीय क्रिकेट खेळत राहिले पाहिजे. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेट अधिक मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. मात्र ते निवड समितीवर आणि त्यांना तो कसा खेळावा हे अपेक्षित आहे, यावर अवलंबून आहे.’’

श्रीलंकेविरुद्धची मालिका एकतर्फी होणार नाही

गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका २-० अशीजिंकणारा श्रीलंकेचा संघ भारताला चांगली लढत देईल, अशी आशा गांगुलीने प्रकट केली. तो म्हणाला, ‘‘श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताचे पारडे जड असणे स्वाभाविक आहे. श्रीलंकेपेक्षा हा संघ अधिक बलवान आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेला भारताने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पराभूत केले आहे. मात्र ही मालिका एकतर्फी होणार नाही. न्यूझीलंडप्रमाणेच श्रीलंकेचा संघही उत्तम प्रतिकार करेल, अशी आशा आहे.’’

पंडय़ाच्या विश्रांतीबाबत आश्चर्य

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला विश्रांती देण्याच्या निर्णयाबाबत गांगुलीने आश्चर्य प्रकट केले. तो म्हणाला, ‘‘हार्दिकच्या विश्रांतीबाबत मला आश्चर्य वाटले. तो दुखापतग्रस्त आहे का, याची मला कल्पना नाही. तो फक्त तीन कसोटी सामने खेळला आहे. या वयात त्याने सातत्याने खेळायला हवे. मला वस्तुस्थिती माहीत नाही.’’

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसंदर्भात गांगुली म्हणाला, ‘‘ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीकडे पाहता भारत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणार नाही. त्याऐवजी दोन फिरकी गोलंदाज संघात असतील. आता पंडय़ा उपलब्ध नसल्यामुळे अष्टपैलू खेळाडूच्या स्थानाकरिता वेगळ्या रचनेचा विचार करावा लागेल.

आयुष्यात प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वतंत्र -धोनी

दुबई : आयुष्यात प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकाकारांना शांतपणे उत्तर दिले आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी नुकतेच धोनीच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आगरकरच्या मताबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना धोनी म्हणाला, ‘‘आयुष्यात प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो आणि त्याचा आदर करायला हवा.’’

३६ वर्षीय धोनी म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट संघाचा एक सदस्य असणे, ही जीवनातील सर्वात प्रेरणादायी गोष्ट आहे. काही क्रिकेटपटूंना दैवी देणगी नसते, परंतु तरीही खेळाविषयीच्या निस्सीम भावनेमुळे ते उत्तम खेळतात. प्रशिक्षकांनी अशा खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. प्रत्येकाला देशाकडून खेळण्याचे भाग्य लाभत नाही.’’

‘‘निकालापेक्षा प्रक्रिया ही अधिक महत्त्वाची असते, यावर माझा नेहमी विश्वास आहे. मी कधीच निकालाची चिंता बाळगत नाही. जेव्हा १०, १४ किंवा ५ धावांची आवश्यकता असते, तेव्हा कोणती योग्य गोष्ट करायची, याचा विचार करतो,’’ असे धोनीने सांगितले.