सप्टेंबर महिन्यात ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’ (एलएलसी) स्पर्धेचे दुसरे सत्र खेळवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले विविध देशांचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. एलएलसी आयोजकांनी प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर एक खास सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १६ सप्टेंबर रोजी एक विशेष सामना खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने या सामन्यासाठी मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकत्यातील ईडन गार्डन्स किक्रेट स्टेडियमवर ‘इंडिया महाराजाज’ आणि ‘वर्ल्ड जायंट्स’ या दोन संघादरम्यान एक विशेष सामना खेळवला जाईल. ‘इंडिया महाराजाज’ संघाचे नेतृत्व सौरव गांगुली करणार आहे. तर, प्रतिस्पर्धी संघाचे नेतृत्व विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गनकडे असेल.

“भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त हा विशेष सामना होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आम्ही काही विशेष मुद्द्यांवर काम करत आहोत. आम्ही या सामन्याला चॅरिटी मॅच म्हणू इच्छित नाही,” असे रहेजा पुढे म्हणाले.

हेही वाचा – Asia Cup 2022 IND vs PAK: भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांचा काळाबाजार तेजीत! अधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

दरम्यान, लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीच्या सहभागावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अ‍ॅक्टिव्ह फोरम फॉर जस्टिस’ नावाच्या गटाने लीगमधील भारताच्या माजी कर्णधाराच्या सहभागावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या गटाने बीसीसीआय सचिव जय शाह यांना याबाबत एक ईमेल पाठवला आहे.

हेही वाचा – ‘देशाचं नाव बदलून…’ मोहम्मद शमीच्या पत्नीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

“बीसीसीआय एक ट्रस्ट आहे. सौरव गांगुली सध्या या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. असे असूनही गांगुली लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पैसे कसे आकारत आहे? याशिवाय लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांना २०१९मध्ये आर्थिक अनियमिततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘ब्लॅक लिस्ट’ केले होते,” असे ईमेलमध्ये लिहिण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे आता लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी, सौरव गांगुली भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरीनिमित्त होणाऱ्या सामन्यात पैसे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.