दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचे विजयाचे ध्येय

केपटाऊन : पहिल्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०७ धावांनी पराभव पत्करल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारी दुसरी कसोटी जिंकून नव्या वर्षांचा विजयारंभ करण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. मात्र बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या दुखापतीची चिंता इंग्लंडला प्रामुख्याने भेडसावत आहे.

क्विंटन डी कॉक आणि कॅगिसो रबाडा यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे आफ्रिकेने पहिल्या कसोटीत सहज विजय मिळवून चार लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कारकीर्दीतील अखेरची मालिका खेळणारा व्हर्नन फिलँडरसुद्धा उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेला सलग दुसऱ्या विजयाचे वेध लागले आहेत.

दुसरीकडे इंग्लंडचा संघ सध्या खडतर काळातून मार्गक्रमण करत आहे. आर्चरला सरावादरम्यान कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या समावेशाविषयीही साशंकता आहे. त्याशिवाय स्टोक्सची कामगिरीसुद्धा अ‍ॅशेस मालिकेनंतर लौकिकाला साजेशी झालेली नाही. मात्र चार वर्षांपूर्वी केपटाऊनलाच कारकीर्दीतील सर्वोत्तम २५८ धावांची खेळी साकारणारा स्टोक्स या सामन्याद्वारे सूर मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मालिकेत दमदार पुनरागमन करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

’ सामन्याची वेळ : दुपारी २ वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स