तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर मात; हेंड्रिक्स, क्लासेनची सुरेख फलंदाजी

अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन व युवा कगिसो रबाडा यांनी केलेली भेदक गोलंदाजी आणि रीझा हेंड्रिक्स व हेनरिच क्लासेन यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर चार विकेट व २५ चेंडू राखून मात केली. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा डाव ४९.३ षटकांत २२८ धावांवर संपुष्टात आला. झिम्बाब्वेसाठी सीन विल्यम्स (६९) आणि ब्रेंडन टेलर (४०) यांनी उपयुक्त योगदान दिले. मात्र रबाडा व स्टेनपुढे इतर फलंदाजांचे काही चालले नाही. दोघांनीही प्रत्येकी तीन बळी मिळवून झिम्बाब्वेच्या संघाला अडीचशे धावांच्या आतच रोखले.

प्रत्युत्तरात आफ्रिकेचे सलामीवीर अ‍ॅडम मार्करम व हेंड्रिक्स यांनी ७५ धावांची भागीदारी करत संघाला छान सुरुवात करून दिली. मार्करम ४२ धावांवर बाद झाला, तर हेंड्रिक्सने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना ६६ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या बाजूने जेपी डय़ुमिनी (१) व कर्णधार फाफ डय़ू प्लेसिस (२५) फार चमक दाखवू शकले नाहीत. मात्र क्लासेनने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानेसुद्धा कारकीर्दीतील पहिल्या अर्धशतकाला गवसणी घालताना ५९ धावा केल्या. विशेष म्हणजे हेंड्रिक्स बाद झाल्यानंतरही क्लासेनने संघाची धुरा वाहिली. तो बाद झाल्यानंतर खाया झोंडोने नाबाद २५ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन झेल, एक यष्टीचीत व उपयुक्त अर्धशतकाची खेळी करणाऱ्या क्लासेनला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर इम्रान ताहिरला तीन लढतींतून १० बळी घेतल्यामुळे मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • झिम्बाब्वे : ४९.३ षटकांत सर्वबाद २२८ (सीन विल्यम्स ६९, डेल स्टेन ३/२९, कगिसो रबाडा ३/३२) पराभूत वि.दक्षिण आफ्रिका : ४५.५ षटकांत ६ बाद २३१ (रीझा हेंड्रिक्स ६६, हेनरिच क्लासेन ५९; डोनाल्ड टिरिपानो २/३५).
  • सामनावीर: हेनरिच क्लासेन
  • मालिकावीर: इम्रान ताहिर