न्यूझीलंडचा दुसरा डाव २७५ धावांत गुंडाळत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात अवघ्या ४५ धावांत गारद झालेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात चिवटपणे प्रतिकार केला. परंतु आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ४ बाद १६९वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडला आधार मिळाला तो डीन ब्राऊलिनच्या शतकाचा. रॉबिन पीटरसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचत ब्राऊलिनने आपले पहिलेवहिले कसोटी शतक साजरे केले. मात्र त्यानंतर थोडय़ाच वेळात तो मॉर्केलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १३ चौकार आणि २ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. ब्रॅडले वॉटलिंगने ४२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. ब्राऊलिन बाद झाल्यावर मात्र न्यूझीलंडच्या डावाची घसरगुंडी उडाली. आफ्रिकेतर्फे डेल स्टेनने सर्वाधिक ३ बळी टिपले. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. सहा षटकांमध्ये फक्त सात धावा देत ५ बळी टिपणाऱ्या व्हर्नान फिलँडरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.