वृत्तसंस्था, रोम
स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अग्रमानांकित यानिक सिन्नेरला पराभूत करताना इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासह पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वी आपण पूर्णपणे लयीत असल्याचेही अल्कराझने सिद्ध केले.अल्कराझने सर्वोत्तम खेळाचे दर्शन घडविताना यंदाच्या हंगामात लाल मातीच्या कोर्टवर आपला १५वा विजय मिळवला. अल्कराझने अंतिम लढतीत सिन्नेरला ७-६ (७-५), ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.अल्कराझ आणि सिन्नेर हे नव्या पिढीतील दोन सर्वोत्तम टेनिसपटू मानले जात आहेत. लाल मातीच्या कोर्टवरील या दोघांमधील झुंजीनंतर साहजिकच त्यांच्यात तुलना सुरू झाली. अल्कराझने अधिक अचूक खेळ केला, तर उत्तेजक सेवनाच्या तीन महिन्यांच्या बंदीनंतर प्रथमच कोर्टवर उतरताना सिन्नेरने दाखवलेली जिद्दही कौतुकास्पद ठरली.
इटालियन स्पर्धेतील पराभवानंतर सिन्नेरने प्रतिस्पर्धी अल्कराझची विशेष स्तुती केली. ‘‘लाल मातीच्या कोर्टवर सध्या तू सर्वोत्तम खेळाडू आहेस,’’ असे सिन्नेर म्हणाला. अंतिम लढतीत सिन्नेरने पहिल्या सेटमध्ये दोन ‘सेट पॉइंट’ वाचवले. हा एकमात्र प्रतिकार वगळता लढतीवर अल्कराझचे पूर्ण वर्चस्व होते. गतवर्षी फ्रेंच स्पर्धेत अल्कराझ आणि सिन्नेर उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. त्या वेळी अल्कराझने पाच सेटच्या लढतीत विजय मिळवला. पुढे जाऊन त्याने विजेतेपदही पटकावले. यंदाही त्यालाच प्रमुख दावेदार मानले जात आहे.
अंतिम लढतीची शक्यता
अल्कराझ जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर सिन्नेर अग्रस्थानी कायम आहे. त्यामुळे फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या कार्यक्रमात (ड्रॉ) दोघे विरुद्ध विभागात असतील. दोघांनी लौकिकाला साजेसा खेळ करत आगेकूच कायम राखल्यास थेट अंतिम फेरीतच ते समोरासमोर येतील.