सेस्क फॅब्रेगस याच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने सेल्टा विगो संघावर ३-० असा सहज विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत चार गुणांची मजबूत आघाडी घेतली असून जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रतिस्पध्र्यावर दडपण आणले आहे.
बार्सिलोनाने स्पॅनिश लीगमधील १०वा विजय मिळवताना दुसऱ्या क्रमांकावरील अ‍ॅटलेटिको माद्रिदला चार गुणांनी मागे टाकले आहे. बार्सिलोनाने या सामन्यावर पूर्णपण वर्चस्व गाजविले. फॅब्रेगसकडून मिळालेल्या पासवर अ‍ॅलेक्सीस सांचेझने नवव्या मिनिटाला गोलजाळ्याची दिशा दाखवत बार्सिलोनाचे खाते उघडले. सेल्टा विगो संघाने पहिल्या सत्राच्या अखेरीस गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण चार्ल्स आणि रफिना यांना गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बार्सिलोनाला आणखी एका गोलाची भर घालता आली. लिओनेल मेस्सीकडून मिळालेल्या पासवर फॅब्रेगसने नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्याने मारलेला फटका गोलबारला लागून बाहेर आल्यावर सेल्टा विगोचा गोलरक्षक योएल रॉड्रिग्जला तो अडवता आला नाही. काही मिनिटानंतर फॅब्रेगसने तिसरा गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.