scorecardresearch

खेळा आणि करा करोनावर मात – पी. व्ही. सिंधूचा मंत्र

फिटनेस कायम राखण्यासाठी खेळ महत्वाची भूमिका बजावतात !

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वालाही बसला. दोन ते तीन महिने सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा विषाणूचा प्रादुर्भाव न होण्यासाठी बंद होत्या. पण होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही देशांनी हळुहळु नियमांसह स्पर्धा सुरु केल्या आहेत. भारतामध्ये सरकारने खेळाडूंना सरावाची परवानगी दिली असली तरीही स्पर्धा सुरु होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. करोनावर मात करणारं ठोस औषध अद्याप तयार झालेलं नाहीये. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या मते सध्याच्या घडीला खेळ लोकांचं मनोबल वाढवण्याच्या कामासाठी चांगला पर्याय आहे.

“तुमची रोग-प्रतिकारक शक्ती चांगली रहायची असेल तर व्यायाम आणि खेळ हे महत्वाचं मानलं जातं. जोपर्यंत करोनावर ठोस लस किंवा औषध तयार होत नाही तोपर्यंत आपली तब्येत सदृढ राखण्यासाठी खेळं सुरु करणं चांगला पर्याय ठरु शकतं. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनीही या काळात व्यायाम आणि स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. यामुळे ब्लडप्रेशर, मधुमेह असे अनेक रोग नियंत्रणात राहू शकतात. दर दिवसाला स्वतःची ४५ मिनीटं वेगळी काढून व्यायाम केल्यास ते सर्वांसाठी फायदेशीर ठरेल.” सिंधू FICCI ने आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल संवादसत्रात बोलत होती.

गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्व भारतीय खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. काही खेळाडूंनी घरातल्या घरात व्यायाम करायला सुरुवात करत आपला फिटनेस कायम राखता येईल याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. भारतात अद्याप बॅडमिंटन स्पर्धा सुरु झालेल्या नाहीयेत, त्यामुळे सिंधू पुन्हा कधी मैदानात उतरतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sports can help win battle against covid 19 pandemic says pv sindhu psd

ताज्या बातम्या