आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी दमदार कामगिरी करावी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आम्ही पुरवू, असे केंद्र सरकारने जाहीर करत टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेला प्रारंभ केला आहे. या योजनेचा काही नामांकित खेळाडूंना लाभ मिळाला असून दुसऱ्या टप्प्यात अजून ३९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिरंदाजपटू दीपिका कुमारी आणि तरुणदीप राय यांचाही समावेश करण्यात आला आहे.
रिओमध्ये होणाऱ्या २०१६च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना आर्थिक मदत मिळावी, यासाठी योजना बनवण्यात आली आहे. यापूर्वी ४५ खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ‘टॉप’च्या समितीने नवीन नावांची शिफारस केली असून या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर आहेत. नवीन यादीमध्ये अ‍ॅथलीट टिंटू लुका, अश्विनी अकुंजी, सिनी जोस, मनदीप कौर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिरंदाजपटू डोला बॅनर्जी, बोम्बायला देवी यांचा समावेश आहे. बॉक्सिंगमध्ये सर्जुबाला आणि सुमीत सांगवान यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे.