‘‘राज्यात क्रीडा क्षेत्राचा प्रसार व्हावा आणि अधिकाधिक विद्यार्थी खेळाकडे वळावेत, याकरिता सर्व क्रीडापटू विद्यार्थ्यांना २५ गुण देणाऱ्या क्रीडा धोरणातील नियमाची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘एनी बडी कॅन जम्प संस्थेच्या पुढाकारातून ‘मार्क फॉर स्पोर्ट्स’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी ते बोलत होते. ‘‘केवळ अतिरिक्त गुण देऊन खेळाचा प्रसार होणार नाही, तर लोकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
देशात केवळ २-३ खेळांनाच प्रायोजक मिळतात आणि त्यामुळे इतर खेळांचा विकास होत नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यंमत्री म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रात यापूर्वी सर्व खेळाडूंना २५ गुण दिले जात होते, परंतु त्यात बदल करून केवळ उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता असलेल्या खेळाडूंना ते दिले जाऊ लागले. मात्र, पूर्वीचा नियम चांगला होता आणि यापुढे त्याच्या अंमलबजावणीचा विचार सुरू आहे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी खेळाकडे वळतील.’’
याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘इयत्ता नववी आणि दहावीचे महत्त्व लक्षात घेता आठवीनंतर अनेक खेळाडू खेळापासून दुरावतात. पालकांकडून त्यांच्यावर अभ्यासाचे दडपण आणले जाते. मात्र, सर्वाना २५ गुण दिल्यास विद्यार्थी खेळात कारकीर्द घडवू शकतात, असे आशादायक चित्र पालकांसमोर उभे केल्यास त्यांच्याकडून खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.’’
खेळासाठी मैदान हवे !
‘मुंबईत खेळण्यासाठी मोकळ्या जागा कमी होत चालल्याने खेळाडूंसाठी मैदानेच राहिलेली नाही. खेळाडूंसाठी मोकळ्या जागा हव्या. मुंबईकर लहान जागेतही खेळतात. मुंबईत एका मैदानावर १५ संघ एकाच वेळी खेळताना मी पाहिले आहेत. कोणाचा चेंडू कुठे जातोय, कोण कुठे उभा आहे, हे कसे कळते, हे त्यांनाच ठाऊक. ऑलिम्पिकमध्ये १५ संघ एकाच वेळी एकाच मैदानात खेळण्याच्या क्रीडा प्रकाराचा समावेश केल्यास आपल्याला पदक नक्की मिळेल,’’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.