Sri Lanka cricketer’s father dies during Asia Cup 2025 match: आशिया चषक २०२५ मध्ये १८ सप्टेंबरला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला गेला, या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत सुपर फोरमध्ये धडक मारली आहे. पण हा सामना सुरू असतानाच श्रीलंकेच्या युवा खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला. सामना सुरू असतानाच श्रीलंकन खेळाडूच्या वडिलांचा मृत्यू झाला. कोच सनथ जयसूर्या यांनी सामन्यानंतर मैदानावरच त्याला ही दु:खद बातमी सांगितली.
श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलाल्गे याचे वडील सुरंगा वेलाल्गे यांचे निधन झाले आहे. दुनिथ आशिया चषक स्पर्धेतील त्याचा पहिला सामना खेळत असतानाच ही घटना घडली. श्रीलंकेने या सामन्यात विजय मिळवला खरा, पण या विजयाचा आनंद मात्र दुनिथ आणि संपूर्ण श्रीलंका संघासाठी क्षणिक ठरला.
श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेलाल्गेच्या वडिलांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
श्रीलंका-अफगाणिस्तान सामना सुरू असतानाच दुनिथच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी समोर आली. पण सामना संपल्यानंतर दुनिथला स्वत: प्रशिक्षक सनथ जससूर्या यांनी दिली. मैदानावरच जयसूर्या दुनिथ वेलाल्गेला ही धक्कादायक बातमी देतानाचा फोटो आणि व्हीडिओदेखील समोर आला आहे. यानंतर लगेचच दुनिथ श्रीलंकेच्या मॅनेजरसह स्टेडियमबाहेर जाताना दिसत आहे.
दुनिथ आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार का हा प्रश्नदेखील समोर येत आहे. श्रीलंकेच्या संघाला सुपर फोरमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि भारताविरूद्ध सामने खेळायचे आणि दुनिथ हा श्रीलंका संघाचा नवा स्टार खेळाडू म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. दुनिथ वेलाल्गेचे वडीलदेखील क्रिकेटपटू होते.
दुनिथ वेलाल्गेने आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात ४ षटकांत १ विकेट घेत ४९ धावा दिल्या. अखेरच्या २०व्या षटकात दुनिथ फारच महागडा ठरला. अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने वादळी फटकेबाजी करत त्याच्या षटकात ५ षटकार लगावले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण त्याच षटकात दुनिथने त्याला झेलबाददेखील केलं. दुनिथच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मोहम्मद नबीने एक्सवर पोस्ट शेअरत दुनिथला खंबीर राहण्याचं करत श्रध्दांजली वाहिली आहे.
“दुनिथ वेल्लालगेचे वडील सुरंगा वेलाल्गे यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते स्वतः थोडंफार क्रिकेटही खेळले होते. तुम्हाला माहितीच आहे की श्रीलंकेत शालेय स्तरावरील क्रिकेट किती मोठं आहे. मी माझ्या सेंट पीटर्स शाळेचा कर्णधार असताना, त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचं नेतृत्व केलं होतं,” असं माजी श्रीलंकन क्रिकेटपटू रसेल आर्नोल्ड यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर समालोचन करताना सांगितलं.