पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद शहरात आत्मघातकी स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले. श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या स्फोटानंतर खेळाडूंनी मायदेशी परतण्याची विनंती बोर्डाला केली. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना मालिका खेळण्याची सक्ती केली आहे. दौऱ्यातून माघार घेऊन परतल्यास चौकशीला सामोर जावं लागेल असा इशारावजा धमकीही बोर्डाने दिली आहे. इस्लामाबाद शहरातच श्रीलंकेचा संघ वास्तव्यास आहे.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत दौऱ्यातील उर्वरित सामन्यांबाबत श्रीलंकेचे खेळाडू, संघव्यवस्थापन, बोर्डाचे पदाधिकारी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, सुरक्षाअधिकारी यांच्यात बैठका झाल्या. या बैठका उशिरापर्यंत चालल्याने उर्वरित दोन वनडे सामने एकेक दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत. १३ आणि १५ तारखेला होणारे सामने आता १४ आणि १६ नोव्हेंबरला होतील असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी सांगितलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरक्षेची हमी दिली आहे त्यामुळे खेळाडूंनी दौरा पूर्ण करावा असं श्रीलंका बोर्डाने म्हटलं आहे. बोर्डाच्या सूचनेनंतरही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ यांच्यापैकी कुणीही माघारी परतल्यास औपचारिक चौकशीला सामोरं जावं लागेल.
श्रीलंकेचा संघ या दौऱ्यात तीन वनडे खेळणार होता. त्यापैकी एक सामना झाला आहे, दोन बाकी आहेत. यानंतर पाकिस्तान, झिम्बाब्वे यांच्यासह तिरंगी मालिका होणार आहे. तिरंगी मालिकेत अफगाणिस्तानचा संघ खेळणार होता मात्र पाकिस्तानशी संबंध दुरावल्याने अफगाणिस्तानने या मालिकेतून माघार घेतली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी हे गृहमंत्रीही आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंची भेट घेऊन सुरक्षेसंदर्भात आश्वस्त केले. त्यांनी पाकिस्तानातील श्रीलंकेच्या उच्चायुक्तांचाही भेट घेतली. श्रीलंकेच्या संघाला पुरवण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रक जारी केलं.
२००९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा गंभीर परिणाम होऊन संघांनी पाकिस्तानात येणं थांबवलं. पाकिस्तान संघाचे सामने युएईत होऊ लागले.
