भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये पार पडलेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. २०० मीटर स्पर्धेत हिमा दासने हे सुवर्णपदक पटकावलं. हिमा दासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. हिमा दासने २०० मीटर अंतर केवळ २३.६५ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.

४०० मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत फक्त २३.६५ सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर पार केलं.

हिमा दासने सहभाग घेतलेला ही वर्षातील पहिलीच स्पर्धात्मक रेस होती. तिने याआधी २३.१० सेकंदात २०० मीटर अंतर पार केलं असून, हा तिचा सर्वोत्तम वैयक्तिक रेकॉर्ड आहे. गतवर्षी तिने हा रेकॉर्ड केला होता. हिमा दासव्यतिरिक्त भारताची धावपटू व्ही. के. विस्मायाने २३.७५ सेकंदात अंतर पार करत कांस्य पदकावर नाव कोरलं.

हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे. ‘पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०१९ मधील २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दासचं अभिनंदन. भविष्यासाठी तुला शुभेच्छा’, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हिमा दासने अभिनंदन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

दुसरीकडे पुरुषांच्या २०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने २०.७५ सेकंदाची वेळ घेत तिसरं स्थान मिळवलं. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर ४०० मीटर स्पर्धेत के एस जीवन याने कांस्य पदक पटकावलं.