जेवढी प्रतिकूल परिस्थिती तेवढ्याच त्वेषाने संघर्ष करत लढणं ही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची ओळख. वर्ल्डकप स्पर्धेत राजधानी दिल्लीत ही ओळख जपत अफगाणिस्तान क्रिकेट संघाने गतविजेत्या इंग्लंडला चीतपट केलं. अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने इंग्लंडला ६९ धावांनी नमवत खळबळजनक विजय साकारला. रेफ्युजी कॅम्प, युद्धाचं सावट, तालिबानची राजवट, अन्य देशात खेळावं लागणं, भूकंपाची बातमी अशा असंख्य आव्हानांना सामोरं जात अफगाणिस्तानचा संघ नेहमीच झुंजार कामगिरी करतो. इंग्लंडविरुद्धचा विजय हे त्याच झुंजार कामगिरीचं द्योतक आहे.

अफगाणिस्तानचा संघ भारतात दाखल होऊन काही तास होतात तोच त्यांना एक वाईट बातमी कळली. शक्तिशाली भूकंपाने अफगाणिस्तान हादरलं. या घटनेत ३००० हून अधिक अफगाणिस्तानच्या नागरिकांनी जीव गमावला. हजारो लोकांनी त्यांचं घर गमावलं. मायदेशी इतकी दुर्देवी घटना झालेली असताना अफगाणिस्तानचा संघ मात्र वर्ल्डकप मिशनवर दाखल झाला होता. त्यांना परत जाणंही शक्य नव्हतं कारण वर्ल्डकपचे सराव सामने सुरू होणार होते.

Elon Musk China Visit
भारताचा दौरा रद्द केल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क अचानक चीनच्या दौऱ्यावर
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खानने तातडीने ट्वीट केलं. त्याने लिहिलं, “भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. ज्यांनी आप्तस्वकीय गमावले आहेत त्यांच्या दु:खात सामील आहे. जे जखमी झालेत त्यांना लवकरात लवकर बरं वाटो. मी वर्ल्डकपचं सगळं मानधन भूकंपपीडितांसाठी देत आहे”. नकारात्मक अशा बातमीने अफगाणिस्तानच्या वर्ल्डकप अभियानाची सुरुवात झाली. पण देशवासीयांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने केलं.

१८३९ मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. पण बाकी वसाहती देशांमध्ये क्रिकेट फोफावलं तसं अफगाणिस्तानमध्ये झालं नाही. आशिया खंडात भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोक्याच्या जागी अफगाणिस्तान वसलं आहे. अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या भांडणात अफगाणिस्तानचा बळी गेला असं म्हटल्यास वावगं ठरू नये. रशियाने १९७९ मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा करायचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानने संघर्ष केला. दहा वर्ष लढत द्यावी लागली. अफगाणिस्तानमधल्या टोळ्यांना अमेरिकेने मदत केली. कोंडी असह्य झाल्यावर रशियाने अफगाणिस्तातून माघार घेतली. रशिया मागे हटल्यावर अमेरिकाचं अफगाणिस्तानमधलं स्वारस्य संपलं.

दोन महासत्ता बाजूला झाल्या आणि अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांनी ताबा मिळवला. नव्वदीच्या दशकात अफगाणिस्तानवर तालिबानचा अंकुश होता. १९९६ ते २००१ एवढा काळ तालिबानने राज्य केलं. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेत ट्वीन टॉवर्सवर दहशतवादी हल्ल्यानंतर चित्र बदललं. अमेरिकेच्या लष्कराने तालिबानी राजवट उलथावून लावली. २०१४ मध्ये अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तान सोडलं.

देशात अस्थिर परिस्थिती असताना अफगाणिस्तानमधल्या नागरिकांनी पाकिस्तानमध्ये रेफ्युजी कॅम्पमध्ये आसरा मिळवला. तेच त्यांचं घर झालं. ताज मलिक या पाकिस्तानमध्ये रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या माणसाने अफगाण क्रिकेट क्लबची स्थापना केली. आजच्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा तो पहिला ढाचा होता. तालिबानच्या अटीशर्तींमध्ये बसत असल्याने त्यांनी क्रिकेटला परवानगी दिली. १९९५ मध्ये अफगाण क्रिकेट फेडरेशनची स्थापना झाली.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अॅफिलिएट सदस्यत्व मिळायला सहा वर्ष गेली. कसोटी खेळणारे दहा संघ, असोसिएट आणि अॅफिलिएट अशी आयसीसीची संघांची रचना आहे. ताज मलिक यांनीच प्रशिक्षणाची धुरा सांभाळली. अफगाणिस्तानकडे अत्याधुनिक स्वरुपाच्या सोयीसुविधा, मैदानं नव्हतं पण त्यांच्याकडे प्रतिभा होती.

२००८ मध्ये अफगाणिस्तानचा संघ वर्ल्ड क्रिकेट लीगच्या डिव्हिजन 5साठी पात्र ठरला. पुढच्याच वर्षी म्हणजे २००९मध्ये त्यांनी २०११ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र कॅनडाविरुद्ध पराभव झाल्याने वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न दुरावलं. मात्र सातत्यपूर्ण चांगल्या प्रदर्शनामुळे आयसीसीने अफगाणिस्तानला वनडेचा दर्जा दिला.

२०१० मध्ये त्यांनी वर्ल्ड ट्वेन्टी-२० म्हणजेच ट्वेन्टी-२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. त्यांचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. मात्र ते हौशीगवशी नाहीत हे त्यांच्या खेळातून स्पष्ट झालं. अफगाणिस्तानच्या वाटचालीत आयसीसीकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा वाटा मोलाचा आहे.

क्रिकेटची वाढ सकस व्हावी यादृष्टीने आयसीसीकडून नव्या सदस्य राष्ट्रांना आर्थिक निधीपुरवठा केला जातो. अफगाणिस्तानने या मदतीचा सकारात्मक उपयोग करून घेतला.

२०१३ मध्ये अफगाणिस्तानचा अफिलिएट दर्जा बदलून त्यांना असोसिएट दर्जा देण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान क्रिकेटसाठी सामंजस्य करार केला. यानुसार पाकिस्तानकडून प्रशिक्षण शिबिरं, अंपायरिंग तसंच क्युरेटर, प्रतिभाशोध शिबिरं यांच्या आयोजनात मदत केली जाते.

आणखी दोन वर्षात २०१५ मध्ये अफगाणिस्तानने वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची अफगाणिस्तानला पहिल्यांदाच संधी मिळाली. प्राथमिक फेरीच्या सहापैकी पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला. स्कॉटलंडवर त्यांनी विजय मिळवला. वरकरणी ही कामगिरी सर्वसाधारण वाटू शकते परंतु जेमतेम वीस वर्षांपूर्वी औपचारिकदृष्ट्या सुरूवात करणाऱ्या अफगाणिस्तानने इतक्या कमी कालावधीत क्रिकेटमधल्या सर्वोच्च स्पर्धेत खेळण्याचा मान पटकावला.

सातत्यपूर्ण प्रदर्शन असणाऱ्या अफगाणिस्तानला आयसीसीने २२ जून २०१७ रोजी कसोटी खेळण्याचा दर्जा बहाल केला. २०१८ मध्ये १४ ते १८ जून या कालावधीत बेंगळुरू इथे भारताविरुद्ध अफगाणिस्तानने कसोटी पदार्पण केलं.

भारत झालं होमग्राऊंड

सुरक्षिततेच्या कारणास्तव अफगाणिस्तानचे सामने त्यांच्या देशात होत नाहीत. सुरुवातीला अफगाणिस्तानने युएई तसंच श्रीलंकेतील दंबुला इथे सामने खेळले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना मदतीचा हात दिला. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर एमओयू केला. ग्रेटर नोएडातील ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अफगाणिस्तानला देण्यात आलं. २०१७ मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली. नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. या मैदानावर एक अवैध लीग खेळवण्यात आल्याने बीसीसीआयने या मैदानाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. त्यामुळे अफगाणिस्तानला होम ग्राऊंड बदलावं लागलं. ते डेहराडून इथे राजीव गांधी स्टेडियमवर खेळू लागले. त्यानंतर लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवरही त्यांनी सामने खेळले.

घरच्या मैदानावर सामने होणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं असतं. पण ते शक्य नाही. खेळपट्टी कशी तयार करायची याचा निर्णय यजमान बोर्डाला घेता येतो. अफगाणिस्तानला हा फायदाही मिळत नाही कारण त्यांचे सामने तटस्थ ठिकाणीच होतात.

दिल्लीत भरघोस पाठिंबा
राजधानी दिल्लीतल्या लाजपत नगर भागाला मिनी काबूल म्हटलं जातं. अफगाण नागरिकांच्या वास्तव्यामुळे हे नाव मिळालं आहे. अफगाणी पद्धतीचं खाणंपिणं मुबलक प्रमाणावर इथे मिळतं. त्यांची संस्कृती अनुभवायला मिळते. दिल्लीत अफगाणिस्तानमधील मुलं शिकण्यासाठी दरवर्षी येत असतात. दिल्लीच्या अन्य काही भागातही अफगाणिस्तानचे नागरिक राहतात. त्यामुळे दिल्लीत सामना असणं अफगाणिस्तानच्या संघासाठी फायद्याचं आहे कारण भरघोस पाठिंबा असतो.

जगभरात ट्वेन्टी२० लीगमध्ये सहभाग
अफगाणिस्तानचे प्रमुख खेळाडू जगभरात ट्वेन्टी२० लीग खेळतात. इंग्लंडविरुद्धच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारे रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान आयपीएल स्पर्धेत खेळतात. रशीद तर आयपीएल स्पर्धेतील प्रमुख विदेशी खेळाडूंपैकी एक आहे. रशीदने आयपीएल संघाचं नेतृत्वही केलं आहे. रहमनुल्ला गुरबाज, नूर अहमद हेही आयपीएलमध्ये खेळतात. जगभरातल्या सर्व ट्वेन्टी२० लीगमध्ये खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये रशीदचं नाव घेतलं जातं. भारतात तसंच आशियाई उपखंडात खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूंकडे आहे.

देशात तालिबानी राजवट
२०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने सत्ता स्थापन केली. तालिबानने महिलांच्या हक्कांवर निर्बंध लागू केले. तालिबान राजवटीत अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णत: डगमगली आहे. कुपोषणाची समस्या उग्र झाली आहे. रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. तालिबान राजवटीच्या जुलमी कारभारामुळे ऑस्ट्रेलियाने यंदा अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रद्द केली. मायदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाही अफगाणिस्तानचे खेळाडू तडफेने खेळतात. जिंकण्यासाठी जीव तोडून खेळतात.

अफगाणिस्तानच्या ताफ्यात भारतीय
अफगाणिस्तानने वर्ल्डकपसाठी माजी भारतीय खेळाडू अजय जडेजा यांची मेन्टॉर म्हणून नियुक्ती केली आहे. बडोद्याचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मिलाप मेवाडा हे अफगाणिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. इंग्लंडविरुद्धच्या विजयात अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांची भूमिकाही मोलाची आहे. ट्रॉट इंग्लंडचेच असून, इंग्लंडच्या खेळातील कच्चे दुवे त्यांनी अचूकपणे हेरत खेळाडूंना मार्गदर्शन केलं.