महाराष्ट्रीय मंडळातर्फे मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले यांच्या स्मरणार्थ राज्य अजिंक्यपद मलखांब स्पर्धा २९ व ३० डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये साडेचारशेपेक्षा जास्त खेळाडू भाग घेत आहेत.
मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले व स्पर्धा सचिव अभिजित भोसले यांनी ही माहिती दिली. या वेळी माजी राष्ट्रीय खेळाडू रवींद्र पेठे व जितेंद्र खरे हेही उपस्थित होते. राज्य स्पर्धेसाठी १६ व १८ वर्षांखालील मुले व मुली, १६ व १८ वर्षांवरील मुले व मुली असे गट ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जळगाव, नाशिक, वर्धा, नागपूर, अमरावती, हिंगोली, अकोला आदी २८ संघांमधील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सागर ओव्हाळकर, नील वाकणकर, शशिकांत म्हसकर, कृष्णा काळे, आदित्य अहिरे, अभिषेक देवल, अनुप ठाकूर, पूजा चव्हाण, आरती साकोरे, केतकी पटवर्धन आदी राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.
मुलांच्या विभागाकरिता पुरलेला, टांगता व दोरीचा मलखांब, तर मुलींकरिता दोरीचा मलखांब हे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धा सांघिक, वैयक्तिक, विविध अ‍ॅपेरेट्स व सवरेत्कृष्ट खेळाडू अशा चार विभागांत होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य मलखांब संघटनेच्या मान्यतेने होणार आहे.