टी-२० विश्वचषक स्पर्धेत भन्नाट फॉर्मात खेळणारा पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. पाकिस्तानने मंगळवारी चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर पाकिस्तानने विजय मिळवत ग्रूप टूमधून उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवलाय. असं असतानाच आता पाकिस्तानी चाहत्यांचा संघावरील विश्वासही फारच वाढला असून यंदा विश्वचषक आम्हीच जिंकणार असं चाहते सांगताना दिसत आहेत. मैदानावरही एक चाहता असेच पोस्ट घेऊन आलेला. मात्र या पोस्टवर इंग्लंडच्या एका जलदगती गोलंदाजाने रिप्लाय दिलाय.
स्टुअर्ट ब्रॉड हा आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये संघाचं नेतृत्व करणाऱ्या इंग्लंडच्या फार मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. स्टुअर्ट ब्रॉड सध्या इंग्लंडच्या कसोटी संघासाठी खेळत असला तरी मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो कधी संघात असतो तर कधी बाहेर. मात्र तो संघात किंवा संघाबाहेर असला तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. याचीच प्रचिती नुकतीच आली तेव्हा त्याने आयसीसीने पोस्ट केलेल्या एका फोटोवर कमेंट केली.
पाकिस्तान क्रिकेट संघाने आपले चारही सामने जिंकले असून त्यांचे एकूण आठ गुण आहेत. तसेच पुढील सामना हा स्कॉटलंडविरोधात असल्याने तो सामना जिंकून पाकिस्तानी संघ अजिंक्य राहत पुढील फेरीत प्रवेश करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पाकिस्तानी चाहत्याचा फोटो पोस्ट केला. हा फोटो पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्यादरम्यानचा होता. या फोटोतील चाहत्याने हातामध्ये पकडलेल्या पोस्टरवर कप आम्हीच जिंकणार असं लिहिलं होतं. कप इज अवर्स, पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर या पोस्टवर होता. हा फोटो शेअर करताना आयसीसीने, “चाहत्यांना असं वाटतं आहे की पाकिस्तानचा संघ हे करु शकतो. ते भविष्य सांगणाऱ्या गोळ्यात पाहू शकतायत असं वाटतंय का?” अशी कॅप्शन फोटोला दिली होती.
या फोटोवर ब्रॉडने दोनच शब्दांची कमेंट केलीय. “किंवा इंग्लंड,” असं म्हणत ब्रॉडने इंग्लंडच्या झेंड्याचा इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केलाय.
पाकिस्तानप्रमाणेच इंग्लंडचा संघही उपांत्य फेरीत पोहचला आहे. उपांत्य फेरीत पोहचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरलाय. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होईल असंही भाकित व्यक्त केलंय.