Stuart Broad Retirement: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या ३७व्या वर्षी तो कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणत आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळत असलेल्या ब्रॉडने ओव्हलवर तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले की, “तो शेवटचा कसोटी सामना खेळत आहे आणि या सामन्याच्या समाप्तीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे आणि जगातील एकूण गोलंदाजांपैकी तो पाचवा गोलंदाज आहे.

ब्रॉडने २०१४ पासून टी२० आंतरराष्ट्रीय आणि २०१६ पासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही. म्हणजेच आता हा त्याच्या करिअरचा शेवटचा टप्पा मानला जात आहे. अनिल कुंबळेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा स्टुअर्ट ब्रॉड हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला कुंबळेला मागे सोडण्याची संधी होती. मात्र ३७ वर्षीय ब्रॉडने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेम्स अँडरसननंतर ब्रॉड हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आता ही त्याची शेवटची कसोटी आहे, म्हणजे त्याची निवृत्ती ही इंग्लंड क्रिकेटसाठी एका युगाचा शेवट मानली जाऊ शकते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारात मिळून ८०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंड क्रिकेटने त्याचे आभार मानले म्हणाले, “Thank you ‘ब्रॉडी”

या माहितीला इंग्लंड क्रिकेटने दुजोरा दिला आहे. तसे, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ब्रॉडनेच स्काय स्पोर्ट्सशी बोलताना याची घोषणा केली. ब्रॉडच्या खास फोटोसह इंग्लंड क्रिकेटने त्याचे आभार मानले आहेत. त्याच्या कारकिर्दीची आकडेवारीही शेअर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने त्याच्या ६०० कसोटी विकेट्स पूर्ण केले. या अ‍ॅशेसमधील त्याची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडच्या २०१० टी२० विश्वचषक विजेत्या आणि चार वेळा अ‍ॅशेस विजेत्या संघाचा भाग आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने केल्या व्यक्त भावना

लंडनमधील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ब्रॉड म्हणाला, “आज किंवा उद्या हा माझा क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. माझ्या आयुष्यातील हा प्रवास अवर्णनीय अशा स्वरूपाचा असून मी पूर्वीइतकेच फिट आहे. ही एक अप्रतिम मालिका आहे ज्याचा मला एक भाग व्हायचे होते आणि नेहमी सर्वोच्च स्थानी राहायचे होते. नॉटिंघमशायर आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा मला भाग होता आले ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मी अ‍ॅशेसचा एक भाग राहू शकलो ही सर्वात आनंददायक गोष्ट आहे. अशा प्रकारच्या मनोरंजक मालिका खेळायला मला नेहमीच आवडते.”

ब्रॉड पुढे म्हणाला, “मी काही आठवड्यांपासून याबद्दल विचार करत होतो. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना माझ्यासाठी नेहमीच शीर्षस्थानी राहिला आहे. मला ऑस्ट्रेलियाबरोबरच्या लढती आवडतात आणि कारकिर्दीत ज्या माझ्या वाट्याला आल्या. ऑस्ट्रेलिया संघ आणि अ‍ॅशेस मला अधिक प्रिय आहे. मला वाटत होते की माझी शेवटची फलंदाजी आणि गोलंदाजी अ‍ॅशेसमध्ये व्हावी आणि मग त्याच ठिकाणी मी निवृत्ती घोषित करेन. ही माझी इच्छा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मान्य केली.”

पुढे दिग्गज हा खेळाडू म्हणाला की, “मी काल रात्री स्टोक्सीला सांगितले आणि आज सकाळी चेंजिंग रूममध्ये माझ्या या भावना व्यक्त केल्या. खरे सांगायचे तर, ही योग्य वेळ आहे असे मला वाटले. पुढे मला असेही वाटले की मित्र किंवा नॉटिंगहॅमशायर संघातील सहकाऱ्यांनी अशा गोष्टी पाहाव्यात ज्या कदाचित समोर आल्या असत्या. मी याबद्दल खूप विचार केला आणि काल रात्री आठ वाजेपर्यंत माझ्या मनात सांगू की नको असा विचार सुरु होता. ५०-५० टक्के दोन्ही बाजूने मी विचार करत होतो. पण जेव्हा मी स्टोक्सीच्या खोलीत गेलो आणि त्याला पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण मी मी जे काही मिळवले त्याबद्दल समाधानी आहे.”

स्टुअर्ट ब्रॉडचा आंतरराष्ट्रीय विक्रम

स्टुअर्ट ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल जर बोलायचे झाले तर, त्याने २००६ मध्ये टी२० फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००७ च्या टी२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने त्याला सहा षटकार ठोकले होते. त्या वाईट टप्प्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले आणि आज तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा आणि एकूण पाचवा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १६७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ६०२ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs WI: विश्वचषक न खेळणाऱ्या वेस्ट इंडीजकडून भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडचे मोठे विधान; म्हणाला, “रोहित-विराटला विश्रांती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात तो शेवटच्या वेळी गोलंदाजी करताना दिसू शकतो. त्‍याने कसोटी क्रिकेटमध्‍ये एक शतक आणि १३ अर्धशतकांसह ३६५६ धावा केल्या आहेत. याशिवाय ब्रॉडने १२१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७८ विकेट्स आणि ५६ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने सर्व क्रिकेटच्या प्रकारात मिळून एकूण ८४५ विकेट्स आतापर्यंत घेतल्या आहेत.