उत्कृष्ट सांघिक खेळाचा प्रत्यय घडवित भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे हरविले आणि अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आव्हान राखले. लागोपाठ दोन पराभवानंतर भारताचा हा पहिलाच विजय आहे. 
भारताला पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांच्याविरुद्धचे सामने गमवावे लागले होते. त्यामुळेच या स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य होते. सहा युवा खेळाडूंसह खेळणाऱ्या भारताने अतिशय जिद्दीने खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली. तिसऱ्याच मिनिटाला पाकिस्तानच्या वकास अहंमद याने पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत गोल नोंदविला आणि संघाचे खाते उघडले. हा गोल स्वीकारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी दडपण न घेता खेळ केला. सहाव्याच मिनिटाला भारताच्या रुपींदरपाल याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. तीन मिनिटांनी भारताला पुन्हा चांगली संधी मिळाली. चेंगलेन साना याने दिलेल्या पासवर आकाशदीप याने गोल करीत भारतास २-१ असे अधिक्य मिळवून दिले. पूर्वार्धात भारताकडे हीच आघाडी कायम होती.
उत्तरार्धात सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला भारताच्या मनदीपसिंग याने दानिश मुस्तफा याच्या पासवर गोल करीत संघाची आघाडी वाढविली. पाकिस्तानच्या खेळाडूंनीही जोरदार चाली सुरू ठेवल्या होत्या. त्यांच्या खेळाडूंनी डीसर्कलमध्ये भारतीय खेळाडूंच्या पायावर चेंडू मारीत पेनल्टी कॉर्नर मिळविण्याचा सपाटा लावला. त्यांना आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यापैकी केवळ एकच कॉर्नरचा त्यांना लाभ घेता आला. भारताचा गोलरक्षक श्रीजेश याने अप्रतिम गोलरक्षण केले व पाकिस्तानच्या अनेक चाली असफल ठरविल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sultan azlan shah cup india outclass pakistan 3
First published on: 12-03-2013 at 07:45 IST