नैतिकता आणि हितसंबंधांचा संघर्ष हे दोन शब्द सध्या देशात वारंवार चर्चेत येतात. यावेळी या चर्चेला निमित्त आहे ते क्रिकेटचे. १५ मेच्या मध्यरात्री मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यानंतर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईतून एस. श्रीशांतसह तीन खेळाडूंना अटक केली आणि त्यानंतर हे सारे महाभारत घडत आहे. या महाकाव्यात दररोज नवनवी पाने लिहिली जात असताना देशातील एक अग्रगण्य वृत्तपत्र आणि त्यांच्या वृत्तवाहिनीने नैतिकता आणि हितसंबंधांचा संघर्ष जपणे या गोष्टीला खूप महत्त्व प्राप्त करून दिले. अनेक दिवस या मुद्यांवरून देशवासियांचे लक्ष वेधण्यासाठी मान्यवरांच्या दिवसभर चर्चा लढवल्या, रकानेच्या रकाने या विषयाला वाहिले गेले. अचानक कुठून तरी राज कुंद्राचे नाव आले आणि या बडय़ा प्रसारमाध्यमाने पांढरे निशाण फडकवत आपले ‘लक्ष्य’च दुसरीकडे वळवले. कदाचित कुंद्रा हा त्यांच्या हितसंबंधातला नाजूक विषय असावा किंवा चेन्नई सुपर किंग्ज, एन. श्रीनिवासन, महेंद्रसिंग धोनी या आपल्या यादीतील माणसांचा लक्ष्यभेद केल्यानंतर तूर्तास त्यांच्या तोफा थंडावल्या असाव्यात.
१९५६मध्ये लाल बहाद्दूर शास्त्री यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाच्या रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. परंतु या अपघाताला ते जबाबदार आहेत म्हणून नव्हे तर, आपल्या राज्यघटनेच्या शिष्टाचाराचा आदर्श जोपासला जावा म्हणून. पण तो इतिहास झाला. आता नैतिकता आणि त्याचा आदर राखून दिलेला राजीनामा ही गोष्ट पाहायला मिळणे दुर्मीळच आहे. गेले तीन आठवडे स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी वेचलेले ‘छोटे मासे आणि मोठे मासे’ यांनी सर्वाचे लक्ष वेधले. परंतु त्याचे राजकारण करून नैतिकता आणि परस्परविरोधी हितसंबंधाचे जे काही रणकंदन माजवण्यात आले, त्याची तीव्रता मोठय़ा प्रमाणात होती.
गेल्या काही दिवसांत संजय जगदाळे यांनी बीसीसीआयच्या सचिव पदाचा, अजय शिर्के यांनी कोषाध्यक्षपदाचा तर राजीव शुक्ला यांनी आयपीएलप्रमुख पदाचा राजीनामा देत आपली निष्ठा आणि प्रेम किती प्रामाणिक आहे, हे मांडण्याचा प्रयत्न केला. ‘सभ्य आणि दिलदार माणसाचा खेळ’ असे बिरूद मिरविणारा हा खेळ एकीकडे आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झगडत असताना अनेक मंडळींचे आणि शक्तींचे नैतिकतेचे उपद्व्याप अधिक लक्षवेधी होते. जगदाळे यांच्या राजीनाम्याचे सर्वानाच दु:ख झाले. कारण या प्रशासकाने खेळावर निस्सीम प्रेम केले. ते कधीच कोणत्या वादात पडले नाहीत. त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा आणि शिस्त यावर कधीच कोणी प्रश्नचिन्ह उभे करू शकत नव्हते. त्यामुळेच ‘बीसीसीआयच्या कार्यकारिणीत पुन्हा कधीही येणार नाही’, असे सांगून ते राजीनामा देऊन गेले. त्यांच्यापाठोपाठ अजय शिर्के यांनीसुद्धा राजीनामा दिला. पण शिर्के यांचा ‘बोलविता धनी’ कोण आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. त्यानंतर बीसीसीआयमधील राजकीय मंडळींनी नैतिकतेचा विषय ऐरणीवर आणला. राजीव शुक्ला, अरुण जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी आणखी खमंग फोडणी दिली. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीपेक्षा श्रीनिवासन यांचा राजीनामा क्रिकेटसाठी अधिक महत्त्वाचा झाला. चेन्नईमध्ये झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतील नाटय़ मात्र सर्वानाच बुचकळ्यात टाकणारे होते. ‘फिक्स’ झालेल्या त्या बैठकीत साऱ्याच तलवारी म्यान झाल्या. राजकीय मंडळींनी आपले तोंड उघडले नाही. उत्तर, दक्षिण आणि पूर्व विभाग यांची मोट बांधून श्रीनिवासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. द्रष्टे राजकारणी शरद पवार यांनी श्रीनिवासन यांच्यावर निशाण साधून वातावरण निर्मिती करीत शशांक मनोहर यांच्यासाठी फिल्डिंग लावली. पण क्रिकेटसाठी अभद्र अशी श्रीनिवासन आणि जगमोहन दालमिया यांची युती झाली आणि श्रीनिवासन यांनी समझोता घडवून आणला. त्यानंतर धोनीच्या हितसंबंधांकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले. ऱ्हीती स्पोर्ट्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्याशी संबंधित खेळाडू परस्परविरोधी हितसंबंधांचाच भाग असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. अखेर हे प्रकरण कुंद्रापर्यंत येऊन ठेपले आणि पर्दाफाश करणारी काही तोंडे अचानक शांत झाली. गुरुनाथ मयप्पनचे चेन्नई सुपर किंग्जमधील पद ‘टीम प्रिन्सिपल’. संघ व्यवस्थापनाचा तो एक भाग आणि बीसीसीआयच्या अध्यक्षांचा जावई म्हणून श्रीनिवासन दोषी. मग स्वत: सट्टेबाजी करणारा राजस्थान रॉयल्सच्या मालकीतील हिस्सेदार कुंद्रा हा अधिक पटीने गुन्हेगार असायला हवा. पण कुंद्राचे नाव येताच हे प्रकरण शांतपणे हाताळले जात असल्याचे प्रत्ययास येत आहे. शिल्पा शेट्टीनेही कुतूहलापोटी एकदा सट्टेबाजी केल्याचे समोर येत आहे. माणसाच्या आयुष्यातल्या कोणत्याही पहिल्या गोष्टीला तो कुतूहलानेच सामोरा जातो. फक्त आपण काय करतोय, याचे भान आपल्याला राखायचे असते हे या अभिनेत्रीला समजायला हवे होते.
नैतिकतेचा उदोउदो होत असताना पवार यांनी योग्य वेळ साधत श्रीनिवासन यांच्यावर शरसंधान केले. मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो, तर असे घडलेच नसते, अशा फुशारक्या त्यांनी मारल्या. आयपीएलचा प्रस्ताव दालमिया यांच्या काळातच ललित मोदी यांनी मांडला होता. परंतु दालमिया यांनी त्याला केराची टोपली दाखवली होती. पण पवारांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या काळात मोदींच्या आयपीएल फॉम्र्युल्याला राजाश्रय मिळाला. नैतिकता आणि परस्पर हितसंबंधांच्या गोष्टी पवारांनी करूच नयेत. २०११च्या विश्वचषकात वानखेडे स्टेडियमला एक न्याय आणि ईडन गार्डन्सला दुसरा, हे सर्वानी पाहिले. पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली नसती तर वानखेडेवरही सामने झाले नसते. ७२व्या वर्षीसुद्धा ते अजून एखाद्या क्रीडा संघटनेचे पद सांभाळण्यासाठी उत्सुक आहेत. मी खेळात कधीच राजकारण आणले नाही, असे सांगत ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भावनांचा एकीकडे आदर करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रावर आपली हुकूमत गाजवत आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदावर सहाव्यांदा विराजमान होण्यासाठी घटनेत दुरुस्ती होण्याची जशी ते वाट पाहात आहेत. तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती, खो-खो आणि कबड्डी खेळाचे वर्चस्व आजही पवार कुटुंबीयांकडे टिकून आहे.
खेळाचे प्रशासन खेळाडूंनीच पाहिल्यास ते हितकारक ठरते, अशी चर्चा बऱ्याचदा केली जाते. पण बीसीसीआयमध्ये राजकारण सुरू असताना सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, रवी शास्त्री, के. श्रीकांत हे भारताचे माजी क्रिकेटपटू मूग गिळून गप्प होते. यातील बऱ्याचशा मंडळींचे समालोचनाचे मोठे करार बीसीसीआयशी निगडित आहेत. श्रीकांत निवड समितीचा अध्यक्ष असताना तो चेन्नई सुपर किंग्जचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता, तेसुद्धा खपवून घेण्यात आले. याचप्रमाणे कुंबळे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करतो. आपले हितसंबंध कशात आहेत, याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे त्याने मौनव्रत धारण करीत श्रीनिवासन यांच्या तंबूत राहणेच पसंत केले. याच कुंबळेने गेल्या वर्षी खेळाडूंच्या दुखापतींचे व्यवस्थापन करणारा कोटय़वधी रुपयांचा एक प्रस्ताव बीसीसीआयकडे सादर केला होता. या प्रस्तावाकडे आणि बीसीसीआयच्या कार्यकारिणीकडे डोळे लावून कदाचित कुंबळेने सध्याचा मार्ग स्वीकारला असावा.
क्रिकेट हा आपला धर्म आणि क्रिकेटपटू म्हणजे दैवत, असे निखळ प्रेम भारतातील जनता या खेळावर करते. पण ताज्या घटनांमुळे सर्वाचाच क्रिकेटवरील विश्वास उडाला आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’प्रमाणेच या खेळातही नाटय़मय, पूर्वकल्पित, खोटे असू शकते यावरील त्यांचा विश्वास दृढ झाला आहे. याचप्रमाणे एकीकडे हा बीसीसीआयचा खासगी संघ आहे, असे न्यायालयात मांडले जाते तर दुसरीकडे याच लोकप्रियतेवर आरूढ होत डॉलर्सचे इमले बांधले जातात. क्रिकेट माहिती अधिकाराच्या कक्षेत का येत नाही, क्रीडा मंत्रालयाच्या कार्यकक्षेत बीसीसीआय का नाही, हे प्रश्न अद्यापही निरुत्तर आहेत. बीसीसीआयमध्ये कार्यरत असलेल्या राजकीय मंडळींची कोणती नैतिकता त्याच्या आड येते, याचे उत्तरही कोणाकडे नाही. तूर्तास, क्रिकेटमध्ये सध्या नैतिकता आणि हितसंबंधांच्या संघर्षांचेच ‘फिक्सिंग’ होत असल्याचे सत्य समोर येत आहे.