नवी दिल्ली : भारतीय संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक खालिद जमिल यांनी आपल्या पहिल्याच मोहिमेत अनुभवी खेळाडू सुनील छेत्रीला वगळण्याचा निर्णय घेतला. जमील यांनी शनिवारी ‘सीएएफए’ नेशन्स चषक स्पर्धेसाठी भारताच्या ३५ संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली.

भारतात प्रतिभावान आक्रमक खेळाडूंची उणीव असल्याचे कारण देत माजी प्रशिक्षक मनेलो मार्क्वेझ यांनी छेत्रीला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला लावून संघात स्थान दिले होते. या स्पर्धेसाठी आपला विचार करू नये असे छेत्रीने सुचवले होते की बंगळूरु एफसी संघाने अद्याप सरावाला सुरुवात केली नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली हे समजू शकले नाही.

प्रशिक्षक जमील यांनी निवडलेल्या संघात बंगळूरु एफसी संघातील गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, बचावपटू चिंगलेनसाना सिंग, राहुल भेके, रोशन सिंग नौरेम आणि मध्यरक्षत्रक सुरेश सिंग या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळेच छेत्रीला वगळल्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. हा प्रश्न प्रशिक्षकांना विचारा असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.

या संभाव्य संघाचे सराव शिबीर बंगळूरु येथे सुरू होईल. आतापर्यंत २२ खेळाडू शिबिरात दाखल झाले असून, उर्वरित १३ खेळाडू त्यांच्या संबंधित क्लबकडून ड्युरंड चषक स्पर्धेत खेळत आहेत. नेशन्स चषक स्पर्धेत भारत ‘ब’ गटात असून, त्यांचे सामने सहयजमान ताजिकिस्तान (२९ ऑगस्ट), इराणविरुद्ध (१ सप्टेंबर) आणि अफगाणिस्तानशी

(४ सप्टेंबर) होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई चषक पात्रता फेरी स्पर्धेसाठी सराव म्हणून भारतीय या स्पर्धेकडे पाहात आहेत. यामुळेच ‘एआयएफएफ’ने निवड झालेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या क्लब संघांनी मुक्त करावे असे आवाहन केले आहे.