नवी दिल्ली : धावांसाठी झगडणारा भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला पुन्हा सूर गवसण्यासाठी माझे २० मिनिटांचे मार्गदर्शन पुरेसे ठरेल. उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंचा सामना करताना त्याच्या उणिवा विशेष जाणवतात, त्याही दूर होऊ शकतील, असा सल्ला माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहलीकडून मोठय़ा खेळींची अपेक्षा आहे. नोव्हेंबर २०१९नंतर त्याला शतकही झळकावता आलेले नाही. इंग्लंड भूमीवरील एकूण सहा डावांत त्याला फक्त ७६ धावाच करता आल्या होत्या. यात प्रलंबित पाचवा कसोटी सामना, दोन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश होता.
‘‘मला २० मिनिटे कोहलीला मार्गदर्शन करता आले, तर मी त्याला फलंदाजीत कोणते बदल करावे, हे सांगू शकेन. ज्याचा त्याला फायदा होईल. यापैकी उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंपुढील त्याच्या समस्येचेही निराकरण करू शकेन. आघाडीच्या फलंदाजाने या सुधारणा अवश्य करायला हव्यात,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
खराब कामगिरीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कोहलीचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले आहे. त्याला वगळण्याचा इशारा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी दिला होता. परंतु बाबर आझम, केव्हिन पीटरसन आणि शोएब अख्तर यांनी कोहलीला पाठबळ देत आगामी सामन्यांत त्याला सूर गवसेल, अशी आशा व्यक्त केली होती.
‘‘इंग्लंडच्या दौऱ्यावर पाहिल्यास कोहली चांगल्या चेंडूंवर बाद झाला आहे. हे चेंडू सोडता आले असते,’’ असे गावस्कर या वेळी म्हणाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
पंतच्या कामगिरीची प्रशंसा
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने जबाबदारीने साकारलेल्या खेळीची गावस्कर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चुकांमधून पंतने धडा घेतला आहे. उजव्या यष्टीबाहेरील चेंडू तो अन्य दिशेला फटकावतो. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातील विजय हा त्याच्या फलंदाजीमुळे मिळाला,’’ असे गावस्कर यांनी सांगितले. ‘‘पंत सीमारेषेबाहेर चेंडू फटकावताना दडपण झुगारत गोलंदाजीच्या आक्रमणाला सामोरा जातो. आगामी ट्वेन्टी-२० मालिकेत या कामगिरीची पुनरावृत्ती करील,’’ अशी अपेक्षा गावस्कर यांनी व्यक्त केली.
कोहलीची ऊर्जा कौतुकास्पद -स्टोक्स
लंडन : विराट कोहलीची खेळातील ऊर्जा आणि बांधिलकी प्रशंसनीय असल्याचे मत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केले आहे. सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या स्टोक्सने म्हटले की, ‘‘तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणारा कोहली हा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. कोहलीविरुद्ध मैदानावर यानंतरही सामने होत राहतील.’’