मुद्गल समितीच्या अहवालामध्ये बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर स्पॉट-फिक्सिंग करत असलेल्या खेळाडूंना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला. यावर भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रीनिवासन यांना दोषींवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारला होता. गावस्कर यांची ही कपोलकल्पित कथा असल्याचे काही जणांनी म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना गावस्कर म्हणाले, ‘‘सकाळी मी कपोलकल्पित कथा रचल्याचे मथळे वाचले. या संदर्भात मी फक्त माझे मत व्यक्त केले. सामनानिश्चितीमध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांना कदापि माफ करता कामा नये. मसालेदार मथळे करण्यासाठी काही जणांनी असे लिहिले असेल; पण त्यांनी माझे मत वाचायला हवे होते.’’