शैली वादग्रस्त ठरल्याने गोलंदाजीवर बंदी घालण्यात आलेल्या वेस्ट इंडिजच्या सुनील नरिनने भारत दौऱ्यातून माघार घेतली आहे. चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरिनची गोलंदाजीची शैली अवैध असल्याचे स्पष्ट झाले होते. लागोपाठच्या दोन सामन्यांत नरिनच्या गोलंदाजीविषयी पंचांनी तक्रार केल्याने या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याला गोलंदाजी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. वेस्ट इंडिज संघ पाच एकदिवसीय, तीन कसोटी आणि एकमेव ट्वेन्टी-२० लढतीसाठी भारत दौऱ्यावर आहे. नरिन वेस्ट इंडिज संघाचा अविभाज्य घटक होता. मात्र शैली वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याला गोलंदाजीच करता येणार नसल्याने त्याने दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. ‘ ‘सुनील नरिन हा आमचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे आमची गोलंदाजी कमकुवत झाली आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष क्लाइव्ह लॉइड यांनी सांगितले. नरिनऐवजी डावखुरा फिरकीपटू सुलेमान बेनला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.