विजयपथावर परतण्यासाठी सनरायजर्स उत्सुक

हैदराबादचा आत्मविश्वास मात्र कमालीचा उंचावला आहे.

गेल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखलेला सनरायजर्स हैदराबाद आता घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या दोन्ही वेळेला दिल्लीवर विजय मिळवला असल्यामुळे हैदराबादचा आत्मविश्वास मात्र कमालीचा उंचावला आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या तीन सामन्यांत शतकी भागीदारी रचत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र हैदराबादची मधली फळी गडगडत आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यांत विजय शंकर, मनीष पांडे, दीपक हुडा आणि युसूफ पठाण हे अव्वल फलंदाज अपयशी ठरले होते. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल हे चांगली कामगिरी करत असून त्यांना अफगाणिस्तानचे फिरकीपटू राशिद खान आणि मोहम्मद नाबी यांची चांगली साथ लाभत आहे.

दुसरीकडे सलामीवीर शिखर धवनची बॅट तळपल्यामुळे भारताच्या विश्वचषक उंचावण्याच्या आशा उंचावल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर मजल मारली आहे. शिखरने ६३ चेंडूंत नाबाद ९७ धावांची खेळी करत दिल्लीला कोलकातावर सात गडी राखून विजय मिळवून दिला होता. धवनसह ऋषभ पंत, कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे धावा काढत असून गोलंदाजीत ख्रिस मॉरिस, इशांत शर्मा आणि कॅगिसो रबाडा यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

संघ

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेअरस्टो, रिद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम, बसिल थम्पी.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारू अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sunrisers hyderabad vs delhi capitals