येत्या रविवारी होणाऱ्या फॉम्र्युला-वन शर्यतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दाखल करून घेतली असून तिची सुनावणी उद्या, शुक्रवारी मुख्य न्यायाधीश पी. सत्यशिवम यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. रविवारी ग्रेटर नोइडा येथे ही स्पर्धा होणार आहे.
२०११ मध्ये झालेल्या फॉम्र्युला वन शर्यतीचा संपूर्ण कर अद्याप भरलेला नसल्याने ग्रेटर नोइडातील बुद्धा सर्किटवर होणाऱ्या फॉम्र्युला वन शर्यतीला स्थगिती द्यावी, अशी याचिका अमित कुमार यांनी दाखल केली आहे. मायावतींच्या बसप सरकारने फॉम्र्युला वन शर्यतीला मनोरंजन करात दिलेल्या माफीला अमित कुमार यांनी २०११ मध्येही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
२०११ मधील फॉम्र्युला वन शर्यतीचे आयोजक जेपी समूहाला बसप सरकारने मनोरंजन करात सूट दिली होती. हा निर्णय रद्द ठरवावा आणि जेपी समूहाला २०११ मधील स्पर्धेसाठीचा संपूर्ण मनोरंजन कर भरायला लावावा, अशी मागणी आताच्या अखिलेश यादव यांच्या सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
मेरी कोम हिरवा झेंडा दाखवणार
नोएडा : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती ‘सुपरमॉम’ मेरी कोम रविवारी होणाऱ्या फॉम्र्युला-वन शर्यताला हिरवा कंदिल दाखवणार आहे. २०११मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ग्रां. प्रि. स्पर्धेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तर गेल्या वर्षी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाजपटू गगन नारंगने हिरवा कंदील दाखवला होता. दोन्ही वर्षांप्रमाणे यंदाही बॉलीवूड अभिनेते, क्रिकेटपटू, राजकारणी यांची उपस्थिती असेल, असा विश्वास फॉम्र्युला-वन शर्यतीचे आयोजक जेपी उद्योग समूहाने व्यक्त केला .