Suresh Raina माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या अडचणी वाढल्या आहेत. सुरेश रैना ईडीच्या रडारवर आला आहे, त्यामुळे त्याला समन्स बजावण्यात आलं आहे. सुरेश रैनाची आज (१३ ऑगस्ट) दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. बेटिंग अॅपचा प्रचार केल्या प्रकरणी ईडीने सुरेश रैनाला नोटीस बजावली आहे. याआधी ईडीने बंदी घालण्यात आलेल्या बेटिंग वेबसाइट आणि अॅप यांचा प्रचार केल्याच्या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींना नोटीस बजावली होती. त्या यादीत सुरेश रैना हे नावही होतं. त्यामुळे आता सुरेश रैनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

सुरेश रैनावर काय आरोप?

सुरेश रैनावर एका बेटिंग ॲपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०२४ मध्ये 1xBet या बेटिंग ॲपने रैनाला ब्रँड ॲम्बेसेडर केलं होतं. केंद्र सरकारकडून 1xBet, Parimatch यासह अनेक ॲप आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. मात्र त्यानंतरही हे ॲप्स आणि या वेबसाइट वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहेत. तसंच त्यांच्या जाहिराती केल्या जात आहेत. सेलिब्रिटी प्रमोशन करत असल्याने या बंदी घातलेल्या ॲप्स आणि वेबसाईटला प्रसिद्धी मिळते. या प्रकरणात रैनाचं नाव समोर आलं आहे. सुरेश रैनानेही याचं प्रमोशन केलं होतं. त्यामुळे रैनाला बुधवारी 1xBet संदर्भात चौकशी केली जाणार आहे. आता सुरेश रैना काय उत्तरं देतो आणि या चौकशीतून काय बाहेर येतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

हरभजन आणि युवराजलाही नोटीस पाठवण्यात आली होती

ईडीने रैनाआधी गेल्या महिन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह या दोघांनाही बेटिंग ॲप्सचं प्रमोशन केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. सोशल मीडियावर हे आजी माजी खेळाडू विविध ॲप्सचं प्रमोशन करत असतात. बेकायदेशीर बेटिंग अॅप्सवरील कारवाई ही यापूर्वीही केली गेली आहे. अनेक सेलिब्रिटीजकडून या अॅप्सचं प्रमोशन केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात तेलंगणा पोलिसांनी राणा डग्गुबाती आणि प्रकाश राज यांच्यासह २५ लोकप्रिय अभिनेत्यांवर गुन्हे दाखल केले होते.

सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द कशी आहे?

सुरेश रैनाने याने टीम इंडियाचं टी 20i, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रैनाने १८ कसोटी मालिका, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी 20i सामने खेळले आहेत. रैनाने या तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ७६८, ५६१५ आणि १६०४ धावा केल्या आहेत. तसेच रैनाने कसोटीत १२, वनडेत ३६ आणि टी 20i मध्ये १३ विकेट्सही घेतल्या होत्या.

आयपीएल कारकीर्द : सुरेश रैनाने आयपीएलमधील २०५ सामन्यांमध्ये ५ हजार ५२८ धावा केल्या. रैनाने या दरम्यान एक शतक आणि ३९ अर्धशतकं झळकावली होती. तसेच २५ विकेट्सही मिळवल्या होत्या.