Suryakumar Yadav With AI Asia Cup Photo: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. स्पर्धा जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही, त्यामुळे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक्सवर आशिया चषक हातात धरलेला एआय-जनरेटेड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिलक वर्मा देखील दिसत आहेत. फोटोसोबत सूर्यकुमार यादवने लिहिले की, “सामना संपल्यानंतर फक्त चॅम्पियन्स लक्षात ठेवले जातात, ट्रॉफीचा फोटो नाही.”

यापूर्वी, माध्यमांशी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्याने कधीही विजेत्या संघाला ट्रॉफीशिवाय मैदाना सोडताना पाहिले नव्हते. तो म्हणाला, “माझी खरी ट्रॉफी ही माझी टीम आहे.”

सामन्यानंतर, जेव्हा पीटीआयने सूर्यकुमार यादवला विचारले की, सात सामने जिंकल्यानंतरही ट्रॉफी नाकारण्यात आला. याबद्दल काय वाटले, तेव्हा सूर्या म्हणाला, “मला वाटते की मी क्रिकेट खेळायला आणि पाहायला सुरूवात केल्यापासून, चॅम्पियन संघा ट्रॉफीशिवाय मैदान सोडत असल्याचे कधीही पाहिले नाही.”

तो पुढे म्हणाला, “आम्ही ४ सप्टेंबरपासून इथे आहोत आणि आज आम्ही एक सामना खेळलो. दोन दिवसांत दोन चांगले सामने झाले. मला वाटते की आम्ही ट्रॉफीसाठी पात्र होतो. आणि मी त्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. मला वाटते की मी माझा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे.”

सामन्यानंतरचे नाट्य

भारताने शेवटच्या षटकात पाकिस्तानचा पराभव करत विक्रमी ९व्यांदा आशिया चषक जिंकला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

एकीकडे भारत मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार नव्हता, तर दुसरीकडे मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी देण्याचा आग्रह धरल्याने पारितोषिक वितरण समारंभाला एका तासाहून अधिक विलंब झाला. पण भारताच्या ठाम भूमिकेनंतर पारितोषिक वितरण समारंभ ट्रॉफी वितरणाविना संपला.

भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्यामागे, त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट आहेत.

नक्वी यांनी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो विमान कोसळल्याचे हावभाव करत आहे. नक्वी यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा व्हिडीओ शेअर करत भारत-पाकिस्तान संघर्षावरून वाद निर्माण केला होता.