Suryakumar Not Shake Hands With Pakistan Captain: आशिया चषक २०२५ मधील चर्चेचा विषय असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्यावर बंदी घालावी, अशी चाहत्यांची मागणी होती. पण तरीही अनेक चाहत्यांच्या इच्छेविरूद्ध सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाने मात्र सामन्यापूर्वीच केलेल्या कृतीमुळे चाहत्यांचा रोष नक्कीच कमी झाला असेल.

पाकिस्तानने भारताविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताने नाणेफेक गमावली असली तरी निर्णय मात्र संघाच्या बाजूने लागला. कारण सूर्यकुमार यादव आणि संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे भारतीय संघाने गोलंदाजीने सामन्याला सुरूवात केली आहे.

क्रिकेट सामन्यामध्ये नाणेफेकीवेळी कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात, जे की खेळभावनेचं प्रतिकदेखील आहे. त्याचप्रमाणे नाणेफेकीपूर्वी आणि नाणेफेकीनंतर कर्णधारांनी हस्तांदोलन करण्याची जणू परंपरा असल्याचं दिसून येत आहे. आशिया चषकातील भारत-पाकिस्तान लढतीवेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघा यांनी हस्तांदोलनासाठी पुढाकार घेतला नाही.

नाणेफेकीदरम्यान दोन्ही कर्णधारांमध्ये मैदानावर काय घडलं?

नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही कर्णधार एकमेकांना गुडलकचा संदेश देतात, पण सूर्यकुमार आणि सलमान अघा यांनी हस्तांदोलन केलं नाही. दोघांनी आपापल्या संघांचे कागद सामनाधिकाऱ्यांना दिले. समालोचक रवी शास्त्री यांच्याशी बोलून सूर्यकुमार ड्रेसिंगरुमकडे परतला. नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार एकमेकांशी बोलले नाहीत. सूर्यकुमारने सामन्याच्या दिवशी सकाळीच हस्तांदोलन करणार नसल्याचं संघासमोर स्पष्ट केलं होतं. तर संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करायचं का नाही, हा त्यांचा परस्पर निर्णय असेल.

भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्याला चांगली सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात सईम अयुबला माघारी धाडलं, ज्यावर बुमराहने कमालीचा झेल टिपला. पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुब सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. तर पुढच्याच दुसऱ्या षटकात बुमराहने संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. झटपट दोन विकेट गमावल्यानंतर फरहान आणि फखर जमान यांनी संघाचा डाव सावरला आहे.