Suryakumar Yadav Reaction on PM Narendra Modi Post: भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत आशिया चषकाचं जेतेपद आपल्या नावे केलं. आशिया चषक स्पर्धेत भारताने एकूण ३ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताच्या या विजयानंतर सर्वांनी संघाचं कौतुक केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रात्रीच पोस्ट शेअर करत ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत संघाचं कौतुक केलं. यावर आता भारताच्या कर्णधाराची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाच्या विजयाच्या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानला जोरदार टोला लगावला. भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच…. तो म्हणजे भारताचा विजय”, असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन व्यक्त केले.”
पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “जेव्हा देशाचं नेतृत्त्व करणारी व्यक्ती पुढे येऊन स्वत: फंटफ्रुटवरून फलंदाजी करत आहे, हे बघून चांगलं वाटतं. त्यांनी स्वत: स्ट्राईक घेऊन धावा केल्या, असं वाटलं. त्यांची पोस्ट पाहून बरं वाटलं आणि सरांचा पाठिंबा आहे म्हटल्यावर खेळाडू पण मोकळेपणाने खेळणारचं ना.”
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देश आनंदात आहे, हे पाहून खूप मस्त वाटतंय. जेव्हा देशात परत जाऊ तेव्हा अजून छान वाटेल आणि अजून चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल”, असं सूर्या एएनआयशी बोलताना पुढे म्हणाला.
पहलगाम दहशतवादी आणि ऑपरेशन सिंदूरनंतर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वांच्या नजरा होत्या. यादरम्यान टीम इंडियाने मात्र उत्कृष्ट कामगिरी करत भारतवासियांना आनंद साजरा करण्याची एक संधी दिली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद आपल्या नावे केलं.