ऑलिम्पिकवारीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारचे भवितव्य सोमवारी औपचारिक निकालाद्वारे ठरेल. दोन ऑलिम्पिक पदके नावावर असलेला सुशील यंदाच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नाही. ऑलिम्पिक पात्रतेची औपचारिकता पूर्ण केलेला नरसिंग यादव भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले. ७४ किलो वजनी गटात खेळणाऱ्या नरसिंगच्या निवडीला आक्षेप घेत सुशीलने निवड चाचणीची मागणी केली. भारतीय कुस्ती महासंघाने ठोस भूमिका न घेतल्याने सुशीलने न्यायालयात धाव घेतली. सुनावणी प्रक्रियेदरम्यान न्यायालयाने नरसिंग यादव आणि कुस्ती महासंघाची भूमिका योग्य असल्याचे सूचित केले. अंतिम निकाल सोमवारी येणार असला तरी तो नरसिंगच्या बाजूने असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
दरम्यान या निकालामुळे ३३ वर्षीय सुशीलचे स्वप्न मावळणार आहे. त्याचे वय आणि दुखापती लक्षात घेता पुढील ऑलिम्पिकमध्ये त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. अशा परिस्थितीत सुशीलचा ऑलिम्पिक प्रवास न्यायालयाच्या निर्णयासह थांबणार आहे.
नरसिंग यादवने गेल्यावर्षी लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. या स्पर्धेवेळी दुखापतग्रस्त असल्याने सुशील सहभागी होऊ शकला नाही. औपचारिकदृष्टय़ा पात्र ठरल्याने नरसिंगने रिओवारीसाठी तयारी सुरू केली. रिओवारी मीच करणार अशी भूमिकाही स्पष्ट केली.
कुस्ती महासंघाच्या नियमावलीनुसार कोटा अर्थात ऑलिम्पिक पात्रता ही देशासाठी असते. या मुद्दय़ाचा संदर्भ घेत सुशीलने रिओवारीसाठी निवड चाचणी होण्याची मागणी केली. त्यावेळी महासंघाने ठोस कोणतीच भूमिका न घेतल्याने सुशीलने कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला.
२००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुशीलने कांस्य तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती.