भारताची फुलराणी सायना नेहवाल जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असून स्विस खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या दिशेने तिने आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकले. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साशिना विघ्नेस वारान हिचा सहज पराभव करून विजयी पताका फडकावत सायनाने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या पारुपल्ली कश्यपनेही अंतिम आठ जणांमध्ये आपले स्थान निश्चित केले.
महिला एकेरीच्या या लढतीत सायनाला विजय मिळवण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. ३४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने वारान हिचा २१-७, २१-१३ असा सहज धुव्वा उडवला. सायनाला आता उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित चीनच्या यिहान वँग हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. कश्यपला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. ५७ मिनिटांच्या कडव्या लढतीनंतर कश्यपने मलेशियाच्या बेर्यनो जिआन झे वाँग याचे आव्हान २१-२३, २१-९, २१-१४ असे परतवून लावले. त्याला आता तैपेईच्या टिएन चेन चोऊ याच्याशी लढत द्यावी लागेल.
साशिनाला याच स्पर्धेत २०११ आणि २०१३ मध्ये पराभूत करणाऱ्या सायनाला या वेळीही फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ६-१ अशी आघाडी घेत ती सायनाने १३-२ अशी वाढवली. १८-७ अशा स्थितीनंतर सलग तीन गुण मिळवत सायनाने पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सहावी मानांकित सायना ३-८ अशा पिछाडीवर पडली होती. मात्र खेळातील चुका टाळत सायनाने ११-१२ अशी मुसंडी मारली. १५-१३ अशा स्थितीतून सलग सहा गुण मिळवत सायनाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. यिहानविरुद्ध सायनाची कामगिरी मात्र चांगली झालेली नाही. यिहानने सायनाला सहा वेळा पराभूत केले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये यिहानने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे सायनाने तिच्याविरुद्ध एकमेव विजय नोंदवला होता.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
सायनाची विजयी पताका!
भारताची फुलराणी सायना नेहवाल जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असून स्विस खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या दिशेने तिने आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकले.

First published on: 15-03-2014 at 04:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiss open saina nehwal enter quarter finals