टी २० वर्ल्डकपमधील ग्रुप २ मधील उपांत्य फेरीची चुरस रंगतदार वळणावर आली आहे. ग्रुप २ मध्ये पाकिस्तानने सलग ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान पटकावलं आहे. मात्र दुसऱ्या संघासाठी न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान या तीन संघात चुरस निर्माण झाली आहे. गुणांसोबत निव्वळ धावगतीची स्पर्धा या तीन संघांमध्ये पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरूद्धचा सामना गमवल्यानंतर स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं आहे. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला मोठ्या फरकाने हरवत धावगती चांगली केली आहे. आता भारताच्या आशा अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून आहेत.

काय आहे उपांत्य फेरीचं गणित ?

  • न्यूझीलंडने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत थेट धडक मारेल
  • न्यूझीलंडने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना गमवल्यास धावगतीवर उपांत्य फेरीचं गणित ठरेल. न्यूझीलंड, अफगाणिस्ता या दोन संघात ज्या संघाची धावगती चांगली असेल, त्यांना भारत नामिबिया सामन्याकडे पाहावं लागेल
  • न्यूझीलंड विरुद्धचा सामना अफगाणिस्तानने जिंकल्यास भारताला नामिबिया विरुद्ध नुसता विजय मिळवून चालणार नाही. कारण तिन्ही संघांचे गुण प्रत्येकी ६ झाले असतील. तेव्हा भारताला धावगतीसह सामना जिंकावा लागेल.

ग्रुप दोनची गुणतालिका पाहुयात

  • पाकिस्तानने सलग चार सामने जिंकत ८ गुणांसह +१.०६५ धावगती राखली आहे.
  • न्यूझीलंडने तीन सामने जिंकत ६ गुणांसह +१.२७७ धावगती राखली आहे.
  • भारताने दोन सामने जिंकत ४ गुणांसह +१.६१९ धावगती राखली आहे.
  • अफगाणिस्तानने दोन सामने जिंकत ४ गुणांसह +१.४८१ धावगती राखली आहे.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि केएल राहुल या भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या षटकापासून हाणामारीला सुरुवात केली. या दोघांनी स्कॉटलंडच्या प्रत्येक गोलंदाजाला १० पेक्षा जास्त धावा कुटल्या. चौथ्या षटकात भारताने अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या षटकात वेगवान गोलंदाज व्हीलने रोहितला अप्रतिम यॉर्करवर पायचीत पकडले. रोहितने १६ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकारासह ३० धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. १८ चेंडूत राहुलने ५० धावा ठोकल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुल झेलबाद झाला. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने ग्रीव्ह्सला षटकार ठोकत भारताच्या नावे ८ गड्यांनी मोठा विजय नोंदवला. या विजयासह भारताने निव्वळ धावगतीमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताचे ४ गुण झाले असून ते आता तिसऱ्या क्रमांवर आहे.