टी २० वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात एका नव्या विक्रमाची नोंद होत आहे. आता नामिबियाच्या गोलंदाजाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्कॉटलँडविरुद्धच्या सामन्यात नामिबियाचा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रंपलमॅननं इतिहास रचला आहे. रुबेननं पहिल्या षटकात ३ गडी बाद करत टी २० वर्ल्डकपमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात तीन धक्के देत स्कॉटलँडवर दबाव आणला.

रुबेन ट्रंपलमॅननं पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्कॉटलँडच्या जॉर्ज मुनसेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कॅलम मॅकल्योड फलंदाजीसाठी आला. त्याला गोलंदाजी करताना वाईड चेंडू टाकला. त्यानंतर दुसरा चेंडू टाकताना निर्धाव राहिला. तिसऱ्या चेंडूवर कॅल मॅकल्योडला बाद केलं. झेन ग्रीननं त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी रिची बेरिंगटॉन आला. मात्र रुबेनच्या भेदक गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. रुबनने या सामन्यात ४ षटकं टाकत १७ धावा देत ३ गडी बाद केले. क्रिकेट कारकिर्दीतला त्याचा सहावा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याने यापूर्वी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ गडी बाद केले आहेत. तर १७ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात ४१ गडी बाद केले आहेत.

आता लढत भारताशी…

स्कॉटलंड आणि नामिबिया हे दोन संघ भारताच्या गटात सामील झाले आहेत. भारताने २००३च्या वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्ध सामना खेळला होता. सचिन आणि गांगुलीने त्या सामन्यात शतके केली. भारताचा पहिला टी-२० विश्वचषक सामना २००७ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध झाला. महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वाची सुरुवात या सामन्यात केली. आता सुपर १२ गटात भारताचा ५ नोव्हेंबरला स्कॉटलंडशी, तर ८ नोव्हेंबरला नामिबियाशी सामना होणार आहे.