आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत स्कॉटलँडने बांगलादेश नमवत मालिकेतील सर्वात मोठा उलटफेर केला. त्यानंतर पापुआ न्यू गिनीचा पराभव करत सुपर १२ मधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. स्कॉटलँडच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असताना त्यांच्या जर्सीने क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही जर्सी एका १२ वर्षांच्या मुलीने डिझाईन केल्याचं स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

क्रिकेट स्कॉटलँडने रेबेका डाउनीचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “स्कॉटलँडची किट डिझाइनर..हॅडिंगटनची १२ वर्षीय रेबेका डाउनी. ती टीव्हीवर पहिला सामना पाहात होती. तिने स्वत: डिझाइन केलेली जर्सी परिधान केली होती. रेबेका तुझे पुन्हा एकदा धन्यवाद”, अशी पोस्ट लिहिली आहे.

क्रिकेट स्कॉटलँडने २०० शाळांमध्ये राष्ट्रीय संघाची जर्सी डिझाइन करण्यासाठी मुलांना सांगितलं होतं. हजारो मुलांनी यात भाग घेत डिझाइन पाठवले होते. यात रेबेकाने डिझाइने केलेली जर्सी सर्वांना भावली आणि त्याची निवड करण्यात आली. रेबेकाबाबत कळताच आयसीसीनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. “काय कमालची किट आहे, रेबेकाने चांगलं काम केलं आहे”, असं ट्वीट आयसीसीने केलं आहे.

पापुआ न्यू गिनी संघाविरुद्धचा सामना स्कॉटलँडने १७ धावांनी जिंकला. या विजयासह स्कॉटलँडने सुपर १२ मध्ये स्थान जवळपास निश्चित झालं आहे. स्कॉटलँडचा संघ पात्रता फेरीतील ब गटात दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. स्कॉटलँडच्या खात्यात आता ४ गुण असून धावगती +०.५७५ इतकी आहे. स्कॉटलँडचा पुढचा सामना ओमानसोबत आहे.त्यामुळे बांगलादेशला आता ओमान आणि पापुआ न्यू गिनी विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवावं लागणार आहे.