टी २० वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शस्मीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एका वर्षात टी २० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शस्मीने युगांडाचा गोलंदाज दिनेश नाकरानी आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टायचा विक्रम मोडित काढला आहे. नाकरानीने २०२१ मध्ये खेळलेल्या १६ टी २० स्पर्धेत ३१ गडी बाद केले आहेत. तर टायने २०१८ या वर्षात ३१ गडी बाद केले होते.

शस्मीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात १७ धावा देत ३ गडी बाद केले आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. शस्मीच्या नावावर आता एकूण ३२ गडी आहेत. तबरेज शस्मी आयसीसी टी २० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. शस्मी श्रीलंकेविरुद्ध खेळताना भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि वनिंदू हसरंगा यांना बाद केलं.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा हॅटट्रीक घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये हॅटट्रीक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तर श्रीलंकेकडून अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी २० स्पर्धेत हॅटट्रीक घेणारा चौथा गोलंदाज आहे. वनिंदूने दोन षटकात हॅटट्रीक पूर्ण केली. १५ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एडन मारक्रमला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर १७ षटकाच्या पहिल्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाला निसंकाच्या हाती झेल देत तंबूचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या चेंडूवर प्रेटोरिअरला बाद करत हॅटट्रीक पूर्ण केली. मात्र हॅटट्रीक घेऊनही संघाला विजय मिळवून देता नाही. वनिंदू हसरंगाने ४ षटकात २० धावा देत ३ गडी बाद केले.

टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ४ गडी आणि १ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. तर श्रीलंकेचं पुढची वाटचाल कठीण झाली आहे. श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे दोन सलामीचे फलंदाज चौथ्या षटकात माघारी परतले. क्विंटन डिकॉक १२, तर रीझा हेन्ड्रिक्स ११ धावा करून तंबूत परतला. दुशमंथा चमीराच्या गोलंदाजीवर दोघंही बाद झाले. त्यानंतर रस्सी वॅनदर दुस्सेन धावचीत होत तंबूत परतला. त्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा आणि एडन मारक्रम यांनी चांगली खेळी केली. मारक्रम १९ धावांवर असताना वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तर बवुमा ४६ धावांवर बाद झाला. तर ड्वेन प्रेटोरिअस शून्यावर बाद झाल्याने दडपण आलं होतं. पण शेवटच्या षटकापर्यंत आलेल्या सामन्यात डेविड मिलारने दोन षटकार मारून सामना फिरवला आणि विजय मिळवून दिला.