टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्ताननं पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सनी मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. त्यानंतर बीसीसीआयसह आजी-माजी खेळाडू मोहम्मद शमीच्या पाठिशा ठामपणे उभे राहिले होते. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. “आमचं लक्ष्य बाहेरच्या ड्रामेबाजीवर नाही. आम्ही पूर्णपणे सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करत आहोत. कुणावरही धर्माच्या आधारावर निशाणा साधणं चुकीचं आहे”, असं कर्णधार विराट कोहलीने सांगितलं.

“काही जण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्य करतात. आता हे सर्व रोजचंच झालं आहे. हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून अशा पद्धतीने त्रास दिला जातो. आम्ही आमच्या ड्रेसिंग रुममधलं वातावरण खेळमेळीचं ठेवतो. बाहेर जो काही ड्रामा सुरु आहे, तो पूर्णपणे त्यांच्या चुका दाखवत आहे”, असं कर्णधार विराट कोहलीने सांगितलं. “कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या धर्माच्या आधारावर निशाणा साधणं चुकीचं आहे. मी कधीच कुणासोबत असा भेदभाव केला नाही. काही लोकांचं फक्त हेच काम असतं. जर कुणाला मोहम्मद शमीचं खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या होत्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला आहे. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले होते.