दुबई : रवींद्र जडेजा (३/१६) आणि रविचंद्रन अश्विन (३/२०) या फिरकी जोडीच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकात सोमवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात नामिबियाला ९ गडी आणि २८ चेंडू राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने विराट कोहली आणि रवी शास्त्री या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या युगाची विजयी सांगता केली.

भारत आणि नामिबियाचे विश्वचषकातील आव्हान या सामन्यापूर्वीच संपुष्टात आले होते. त्यामुळे हा सामना केवळ एक औपचारिकता म्हणून खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात नामिबियाने दिलेले १३३ धावांचे लक्ष्य भारताने १५.२ षटकांत गाठत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

के. एल. राहुल (नाबाद ५४) आणि रोहित शर्मा (५६) या सलामीच्या जोडीने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्यांनी ९.५ षटकांत ८६ धावांची सलामी दिल्यावर रोहितला यान फ्रेलिंकने बाद केले. राहुलने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या (नाबाद २५) साथीने ५० धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, नामिबियाला २० षटकांत ८ बाद १३२ धावाच करता आल्या. स्टीफन बार्ड (२१) आणि मायकल वॅन लिंगेन (१४) यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, जडेजा-अश्विनपुढे नामिबियाची मधली फळी ढेपाळली. डेव्हिड वीजने (२६) एकाकी झुंज दिल्याने नामिबियाला सन्मानजनक धावसंख्या करता आली.

संक्षिप्त धावफलक

नामिबिया : २० षटकांत ८ बाद १३२ (डेव्हिड वीज २६; रवींद्र जडेजा ३/१६, रविचंद्रन अश्विन ३/२०) पराभूत वि. भारत : १५.२ षटकांत १ बाद १३६ (रोहित शर्मा ५६, के. एल. राहुल नाबाद ५४; यान फ्रेलिंक १/१९)

सामनावीर : रवींद्र जडेजा

कोहली-शास्त्री जोडीच्या कार्यकाळातील भारताचे यश

दुबई : भारतासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषकाची सांगता झाली. याचसह विराट कोहली आणि रवी शास्त्री या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या युगाचा अस्त झाला आहे. शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला असून कोहलीने भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोहली-शास्त्री जोडीच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटला बहुमूल्य यश प्राप्त झाले. त्यांच्या यशस्वी कामगिरीवर टाकलेली एक नजर.

* बॉर्डर-गावस्कर करंडक विजय (२०१८-१९) : कोहलीच्या नेतृत्वात आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत धूळ चारण्याची विक्रमी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच आशियाई संघ ठरला.

* सलग दोनदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय : २०२०-२१मध्येही भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. कोहली वैयक्तिक करणास्तव पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परताला. मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

* जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम फेरी (२०२१) : भारताने कोहली-शास्त्री जोडीच्या मार्गदर्शनात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

* एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरी (२०१९) : इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ सालच्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने कोहली-शास्त्री जोडीचे भारताला विश्वचषक जिंकवून देण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

* ४२ महिने कसोटी क्रमवारीत अव्वल : कोहलीच्या नेतृत्वात आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनात भारतीय संघ २०१६ ते २०२० या कालावधीत तब्बल ४२ महिने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला.

* शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्या. तसेच भारताने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले.