आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मधील सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय नोंदवला. या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने मजेशीर ट्वीट करत केले होते. त्याने या ट्वीटमध्ये इंग्लंडचा माजी कप्तान मायकेल वॉनला चिमटा काढला होता. आता वॉनने त्याला दमदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने सराव सामन्यात इंग्लंडला ७ गडी राखून मात दिली.

या सामन्यानंतर वसीम जाफरने आपल्या ट्वीटद्वारे सर्वांना हसवले. त्याने विजयादरम्यानच्या खास तीन गोष्टी चाहत्यांना सांगितल्या. केएल राहुल आणि इशान किशनची फलंदाजी, बुमराह, अश्विन आणि शमीकडून गोलंदाजी आणि मायकेल वॉनचे ऑफलाइन असणे या तीन गोष्टींचा उल्लेख वसीमने ट्वीटमध्ये केला होता.

हेही वाचा – T20 WC: “म्हातारा झालायस तू म्हातारा”, पाकिस्तानच्या बाबर आझमनं आपल्याच खेळाडूची उडवली खिल्ली! पाहा VIDEO

वॉनचे उत्तर

मायकेल वॉनने जाफरला चोख प्रत्युत्तर दिले आहे. वॉन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”वसीम मी समुद्रकिनाऱ्यावर रम पिण्यात खूप व्यस्त होतो आणि हो सराव सामने निरुपयोगी आहेत आणि त्यांना काहीही अर्थ नाही.” वॉन सध्या कॅरेबियन बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यामुळे सराव सामना पाहू शकला नाही.

मायकेल वॉन आणि वसीम जाफर दोघेही त्यांच्या शब्दांच्या युद्धाद्वारे सोशल मीडियावर चाहत्यांचे मनोरंजन करतात. विशेषतः भारत-इंग्लंड सामन्यांच्या दरम्यान हा संघर्ष पाहणे मनोरंजक असते.