T20 World Cup 2026 dates revealed: टी-२० विश्वचषक २०२६च्या तारखा समोर आल्या आहेत. आगामी टी-२० वर्ल्डकप हा गतविजेता भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली होणार आहे. २०२४च्या विश्वचषकाप्रमाणे पुढील वर्षी स्पर्धेतही २० संघ खेळणार आहेत. आयसीसीने या विश्वचषकाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
टी-२० विश्वचषकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. आयपीएलपूर्वीच हा विश्वचषक होण्याची शक्यता आहे. गतवर्षी टी-२० विश्वचषक हा आयपीएलनंतर जूनमध्ये खेळवला गेला होता. भारत-श्रीलंकेत होणाऱ्या या विश्वचषकाचा अंतिम सामना मात्र भारतात कुठे खेळवला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, २०२६ चा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवला जाईल. यादरम्यान भारतात किमान पाच ठिकाणी आणि श्रीलंकेत दोन ठिकाणी सामने खेळवले जातील. तथापि, कोणता सामना कुठे खेळवायचा हे अद्याप निश्चित झालेलं नाही. आयसीसी अद्याप या स्पर्धेसंबंधित तयारी करत आहे. स्पर्धेतील काही गोष्टी या निश्चित केल्या असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना कुठे खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. वृत्तानुसार, पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचणार की नाही यावर अंतिम सामना अहमदाबाद की कोलंबोत होणार हे निश्चित होईल. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर फायनल भारतात खेळवला जाणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे, दोन्ही संघ एकमेकांच्या देशात क्रिकेट सामने खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सर्व सामने पाकिस्तानात खेळेल.
टी-२० विश्वचषक २०२६ साठी १५ संघ ठरलेत पात्र
आतापर्यंत १५ संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली या संघांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. उर्वरित ५ संघांपैकी दोन आफ्रिका पात्रता फेरीतून आणि तीन आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता संघातून येतील. ही स्पर्धा २०२४ च्या टी२० विश्वचषकाप्रमाणेच खेळवली जाईल. २० संघांना प्रत्येकी पाच गटात विभागले जाईल.