टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १६० धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरताना विराट कोहली मात्र मैदानात भक्कमपणे उभा होता. यानंतर त्याने हार्दिक पांड्याच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ११३ धावांची भागीदारी केली. भारताने चार गडी राखून हा सामना जिंकत यशस्वी सुरुवात केली आहे. दरम्यान सामना संपल्यानंतर हार्दिकने विराट कोहलीची मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत फलंदाजी करतानाचा अनुभव सांगितला. १९ व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने रौफला लगावलेल्या सलग दोन षटकरांचंही पांड्याने कौतुक केलं.

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर PCB चे प्रमुख रमीज राजा यांचं ट्वीट, म्हणाले “खेळ कधी क्रूर आणि अन्यायकारक…”

“विराट कोहलीने खेळलेले ते दोन फटके सर्वोत्तम होते. त्यातील एकही फटका लागला नसता तर ते आमच्या पुढे गेले असते. मी अनेक षटकार लगावले आहेत, पण ते दोन षटकार विशेष होते. मी त्यालाही सांगितलं की, मी इतकं क्रिकेट खेळलो आहे पण विराट कोहली वगळता कोणालाही अशाप्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाही,” असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आमच्याकडे दिवाळीचे फटाके फोडतायत आणि तुम्ही उगाच…; सेहवागचा पाकिस्तानी चाहत्यांना टोला; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला “शांत राहा”

“सामन्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे, आम्ही संघर्ष केला पण एकत्रितपणे विजय मिळवला. जर आम्ही मैदानात जाऊन फटके लगावत सहज विजय मिळवला असता तर तो कदाचित इतका विशेष नसता. आम्ही संघर्ष केल्याने तो विशेष आहे. आव्हान किती कठीण होत आहे याबाबत आम्ही सतत एकमेकांशी चर्चा करत होतो. पण पाकिस्तानलाही श्रेय दिलं पाहिजे. त्यांनी उत्तम गोलंदाजी केली. त्यांनी चांगली खेळी केली,” असंही हार्दिक पांड्याने सांगितलं.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना हार्दिक पांड्याने सांगितलं की “मला ड्रेसिंग रुममध्ये फार तणाव असल्याचं जाणवत होतं. हा एक मोठा सामना होता. पण माझ्याबद्दल माहिती नाही. कारण मी मैदानात गेल्या तेव्हा मनात भावनांचा गोंधळ नव्हता. येथे मला खेळायचं होतं आणि मी खेळतोय याचा आनंद होता”.

पुढे त्याने विराटला म्हटलं की “मी त्यावेळी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती, पण बाद होऊ दिलं नसतं. माझं ध्येय स्पष्ट होतं. जितका होईल तितका तुझा त्रास कमी करायचा होता. तू हे अनेकदा केलं आहेस आणि दबावात असतानाही इतकी चांगली खेळी तुझ्याशिवाय कोणी करु शकत नाही”.