टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत आज पाकिस्तानविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेबाहेर गेला आहे. पायाच्या दुखापतीमुळे फर्ग्युसन ही स्पर्धा खेळू शकणार नाही. अॅडम मिल्नेने फर्ग्युसनची जागा घेतली आहे.

किवी प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “स्पर्धेच्या पूर्वसंध्येला असे घडणे ही लॉकीसाठी खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे आणि संपूर्ण संघ सध्या खरोखरच त्याच्याबद्दल भावना व्यक्त करत आहे.” भारताविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवल्यानंतर पाकिस्तान संघ आज न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळत आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातून अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने पाकिस्तान संघ आज बदला घेण्याचा विचार करेल.

हेही वाचा – भारताविरुद्ध जोरदार बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचं ट्वीट; शमीला शिव्या देणाऱ्यांना म्हणाला…

न्यूझीलंडने पाकिस्तानात पोहोचल्यानंतर सुरक्षेचे कारण सांगून खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या तयारीला मोठा धक्का बसला आणि नंतर इंग्लंडनेही दौरा रद्द केला. आता या सामन्याकडे पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात बदला घेण्याचा सामना म्हणून पाहिले जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टील, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी.