टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला लक्ष्य केले गेले. शमीला सोशल मीडियावर शिवीगाळही करण्यात आली. संघ आणि देशावरील त्याच्या निष्ठेबद्दलही अनावश्यक गोष्टी बोलल्या जात होत्या. या कठीण काळात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकरसारखे दिग्गज माजी खेळाडू शमीच्या समर्थनार्थ पुढे आले. आता शमीला पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची साथ मिळाली आहे. रिझवानने एका ट्वीटमध्ये शमीचे समर्थन केले आणि सोशल मीडियावर त्याला शिव्याशाप देणाऱ्यांचा समाचार घेतला.

रिझवान म्हणाला, “एखाद्या खेळाडूला आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी खेळताना ज्या प्रकारचे दडपण, संघर्ष आणि त्याग करावा लागतो, त्याची कल्पनाही करता येणार नाही. मोहम्मद शमी हा स्टार आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. कृपया आपल्या खेळाडूचा आदर करा. या खेळाने लोकांना जवळ आणले पाहिजे आणि त्यांना विभाजित करू नये.”

हेही वाचा – आनंदाची बातमी..! टीम इंडियाच्या हेड कोचसाठी राहुल द्रविडनं भरला अर्ज; ‘हा’ दिग्गज होणार NCA प्रमुख?

भारताविरुद्धच्या सामन्यात रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. रिझवानने कर्णधार बाबरच्या साथीने १५२ धावांचे लक्ष्य १८व्या षटकात पूर्ण केले. त्या सामन्यात रिझवानने शमीवर हल्ला चढवला. शमी पाकिस्तानच्या डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी आला. रिझवानने आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर ६ चौकार आणि पुढच्या दोन चेंडूंवर २ चौकार मारले. या सामन्यात शमी चांगलाच महागात पडला. त्याने ३.५ षटकात एकूण ४३ धावा दिल्या.