टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानीकारक पराभव करत इतिहास रचला. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारताला एकदाही पराभूत न करु शकलेल्या पाकिस्तानमध्ये यानंतर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र यावेळी सामन्याचे मूल्यांकन करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिसने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज पठण केलं होतं. या नमाजाबाबत वकारने एका पाकिस्तानी चॅनेलशी संभाषण करताना केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. भारताच्याही माजी खेळाडूंनी यावरुन नाराजी जाहीर करत वकारला सुनावलं होतं. त्यानंतर अखेर वकार युनिसने माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हिंदूंमध्ये उभं राहून…”, पाकिस्तानच्या वकार यूनुसचं ‘ते’ वक्तव्य ऐकल्यानंतर वेंकटेश प्रसाद भडकला; म्हणाला, “किती निलाजरा..”

वकार युनिसने ट्वीट करत माफी मागितली आहे. “त्या उत्साहाच्या क्षणी मी असं काहीतरी बोललो ज्यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी यासाठी माफी मागतो. हे जाणीवपूर्वक झालेलं नव्हतं. माझ्याकडून झालेली चूक होती. तुमचा धर्म, रंग आणि वंशाचा विचार न करता खेळ सर्वांना एकत्र आणतो,” असं वकारने म्हटलं आहे.

वकारने काय म्हटलं होतं –

रिझवानने ‘हिंदूंसमोर नमाज’ अदा केल्याने वकारला आनंद झाला होता. तो म्हणाला होता की, “रिझवानने केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने मैदानात हिंदूं लोकांमध्ये उभे राहून नमाज अदा केली. त्यामुळे ते खूप खास होते.”

हर्षा भोगलेंनी फटकारलं –

वकारच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी नाराजी जाहीर केली होती. ”वकार युनूससारख्या माणसाचे रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे त्याच्यासाठी खूप खास होते, हे म्हणणे माझ्या आयुष्यातील सर्वात निराशाजनक गोष्टींपैकी एक आहे. आपल्यापैकी बरेचजण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. पण याबद्दल ऐकून खूप त्रास होतो,” असं ते म्हणाले होते.

“मला मनापासून आशा आहे, की पाकिस्तानमध्ये खेळावर खरोखर प्रेम करणारे लोक असतील आणि त्यांना या विधानाचा धोका लक्षात येईल. तेही माझ्या निराशेत सामील होतील. हा फक्त एक खेळ आहे, क्रिकेटचा सामना आहे हे सांगणे आणि लोकांना पटवून देणे माझ्यासारख्या क्रीडाप्रेमींना खूप कठीण जाईल. तुम्हाला क्रिकेटपटू हे खेळाचे राजदूत वाटतात. ते थोडे अधिक जबाबदारीने बोलतील. मला खात्री आहे की वकार या विधानाबद्दल लवकरच माफी मागेल. आपल्याला क्रिकेट जगताला एकत्र करायचे आहे, धर्माच्या आधारावर विभागायचे नाही,” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

वेंकटेश प्रसादनेही जाहीर केली नाराजी –

वेंकटेश प्रसादनेही वकारला फटकारलं होतं. ”एखाद्या खेळात हे सांगण्यासाठी जिहादी मानसिकतेला दुसऱ्या स्तरावर नेले जाते. किती निलाजरा माणूस माणूस आहे”, असे ट्वीट प्रसादने केले आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पाकिस्तानने प्रथमच विजय मिळवला. पाकिस्तानने रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup waqar younis apologises for calling rizwan on field namaz in front of hindus special sgy
First published on: 27-10-2021 at 10:34 IST