शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-२० वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला ३ धावांनी पराभूत केले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विंडीजने २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या. ख्रिस गेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायर आणि कायरन पोलार्ड या विंडीजच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. पदार्पणवीर रोस्टन चेजची झुंजार आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ५ बाद १३९ धावांपर्यंतच पोहोचता आले. जेसन होल्डर आणि अकिल हुसेन यांनी किफायतशीर गोलंदाजी केली. विंडीजच्या पूरनला सामनावीर पुरस्कार मिळाला. बांगलादेशचा हा सलग तिसरा पराभव असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचा डाव

विंडीजच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर म्हणून पाठवलेल्या शाकिब अल हसनला मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेलने त्याला होल्डकरवी झेलबाद केले. तो बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर मोहम्मद नईमही माघारी परतला. त्यानंतर लिटन दासने किल्ला लढवला. दुसऱ्या बाजूला विंडीजने सौम्या सरकार, मुशकिकूर रहिम यांना माघारी पाठवत दबाव वाढवला. संथ खेळपट्टीवर रसेल, होल्डरने जास्त फटकेबाजी करू दिली नाही. कप्तान महमूदुल्लाहने ३१ धावा केल्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दास १९व्या षटकात माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या विजयाच्या आशा मावळल्या. दासने ४४ धावा केल्या, तर महमूदुल्लाह ३१ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा – दणका..! लाइव्ह शोमध्ये झालेल्या भांडणानंतर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं शोएब अख्तरसह ‘त्या’ अँकरला…

विंडीजचा डाव

पदार्पणवीर रोस्टन चेजची झुंजार आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजने बांगलादेशसमोर २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या. ७० धावांच्या आत विंडीजने ख्रिस गेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायर आणि कायरन पोलार्ड या स्टार फलंदाजांना गमावले. रोस्टन चेजने निकोल पूरनसोबत किल्ला लढवला. चेजने ३९ धावा केल्या, तर पूरनने २२ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन, मुस्तफिजूर रहमान, शोरिफुल इस्लाम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup west indies beat bangladesh by 3 runs adn
First published on: 29-10-2021 at 20:12 IST