Indian Cricket Team Asia Cup 2025 Victory Celebration: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास मात्र नकार दिला आहे. भारताच्या विजयानंतर तब्बल सव्वा तास वाट पाहिल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू झाली. भारतीय संघाने जेतेपद पटकावल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पण यानंतर मात्र भारतीय संघाने जेतेपदाचं सेलिब्रेशन मात्र जोरदार केलं.
टीम इंडियाने आशिया चषक जेतेपदानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून नक्वी यांना विजेत्या संघाला ट्रॉफी सोपवायची होती. पण एसीसीचे अध्यक्ष असण्याबरोबरच नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्री देखील आहेत. शिवाय, नक्वी यांनी भारताबद्दल वादग्रस्त पोस्ट देखील पोस्ट केल्या. यामुळेच संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
भारतीय संघाने प्रेझेंटेशन सेरेमनी संपल्यानंतर मात्र चॅम्पियन्स लिहिलेल्या बोर्डाच्या इथे एकत्र जमत विजयाचं सेलिब्रेशन केलं. सूर्यकुमार यादवने हातात प्रतिकात्मक ट्रॉफी असल्याचं पकडत रोहित शर्माप्रमाणे तो हळूहळू चालत आला आणि हात उंचावले. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. भारतीय संघाच्या या प्रतिकात्मक सेलिब्रेशनचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील खेळाडूंबरोबर कोच आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ तिथे उपस्थित होता. इतकंच काय तर ट्रॉफी स्वीकारतानाच्या वेळचे फटाके आणि जल्लोषही या प्रतिकात्मक सेलिब्रेशनवेळी पाहायला मिळाला. भारताच्या खेळाडूंनी विजेत्या संघाचे मेडलदेखील स्वीकारले नाहीत. दरम्यान भारताचे काही खेळाडूंनी मात्र स्पर्धेतील पारितोषिक स्वीकारली.
तिलक वर्माला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. तर कुलदीप यादवला स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर अभिषेक शर्मा हा स्पर्धेतील सर्वाेत्कृष्ट खेळाडू ठरला, त्याला ट्रॉफी, बक्षीसाची रक्कम आणि कार भेट म्हणून देण्यात आली.